"महाराष्ट्रातील जनतेने मला माफ ...", महाड येथील प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी
By अजित मांडके | Published: May 29, 2024 06:43 PM2024-05-29T18:43:40+5:302024-05-29T18:44:57+5:30
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.
ठाणे- शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. पण यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.
"मनुस्मृतीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन, आणि २५ डिसेंबर १९२७ त्यांनी स्वत: मनुस्मृतीचे दहन केले होते. तेव्हा सांगितले होते. मनु हा विषमत्तेचा, चातुर्वण्याचा, स्त्री द्ेवशाचा जन्मदाता आहे, अशा मनु शालेय पुस्तकात समावेश होणे हे आम्हाला मान्य नाही. त्याच्या विरोधात आंदोलन केले. ते करीत आमच्याकडून अनावधनाने मनुस्मृतीचे पुस्तक फाडले जात असतांना, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडला गेल्याचे दिसत आहे. ही आमची अक्षम्य चुकी आहे. त्यामुळे या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडून झालेल्या घटनेबद्दल महाराष्टÑातील तमाम नागरीकांची लीन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो. हे प्रकरण माझ्या हृदयाला लागले आहे.मी माझ्या आयुष्यात एकदा भुमिका घेतली की माफी मागत नाही, पण मी ज्या अर्थी माफी मागत आहे, त्या अर्थी ते मी मनापासून बोलत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मला माफ करा, असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.