फिनिक्युलर रोपवेच्या कामाची आमदार कथोरेंनी केली पाहणी
By पंकज पाटील | Published: February 22, 2024 05:39 PM2024-02-22T17:39:45+5:302024-02-22T17:40:36+5:30
आमदार किसन कथोरे हे 2004 मध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी मलंगडावर फिनिक्युलर रोपवे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर जाण्यासाठी देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फिनिक्युलर रोपवे उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून त्या कामाची पाहणी आमदार किसन कथोरे यांनी केली. तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून ही फिनिक्युलर रोपवे तयार करण्यात आली असून हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबवण्यात आला आहे.
आमदार किसन कथोरे हे 2004 मध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी मलंगडावर फिनिक्युलर रोपवे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. राज्यातील पथदर्शी प्रकल्पांमध्ये त्याचा समावेश करून प्रत्यक्ष कामाला 2012 मध्ये सुरुवात करण्यात आली. विधानसभा क्षेत्राचे विभाजन झाल्यानंतर आमदार कथोरे हे मुरबाड विधानसभेत आल्याने फिनिक्युलर प्रकल्पाकडे काहीसे शासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत होता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आणि नव्या ठेकेदाराची नेमणूक करून या कामाला गती दिली. गेल्या वर्षभरापासून या रोपेच्या कामाला गती देण्यात आली असून हे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.
एवढेच नव्हे तर फिनिक्युलर ट्रेनची चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पायाभरणी आमदार किसन कथोरे यांनी केली होती तर आता या कामाचा कळस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रचला जात आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रयत्न केले असून आता या सर्वांच्या प्रयत्नामुळे फिनिक्युलर रोपवे खऱ्या अर्थाने गतिमान होणार आहे.
ज्या फिनिक्युलर रोपवेची चाचणी सुरू आहे त्या फ्युनिक्युलरमध्ये बसून स्वतः आमदार किसन कथोरे अधिकाऱ्यांसह गडावर गेले. सुप्रिमो सुयोग रोपवे प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर शिवशंकर लातूरे यांनी या प्रकल्पाची माहिती कथोरे यांना दिली. शासनाचा कोणताही निधी न घेता बीओटी तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात आला असून हा यशस्वी करणे हा शासनाचे ध्येय असल्याची माहिती लातूरे यांनी दिली. आपण पाहिलेले रोपवेचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे पूर्ण होत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे कथोरे यांनी सांगितले.