उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे
By सदानंद नाईक | Published: August 12, 2022 06:48 PM2022-08-12T18:48:51+5:302022-08-12T18:49:47+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली. तसेच शहरातील समस्या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारत पुनर्बांधणी बाबत गेल्या वर्षी राज्य शासनाने एक समिती गठीत केली. मात्र निर्णय विना समितीचा अहवाल मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात धूळ खात पडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच शहराच्या हद्दीतुन बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. पाणी बिला पोटी महापालिका वर्षाला ३५ कोटी खर्च करीत आहे. तसेच दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाली. डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्नही असाच अडगळीत पडला आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शहरातील समस्या सुटत नसेलतर, आमदार पदी म्हणून राहण्याचा हक्क आपल्याला नसल्याची भूमिका आमदार कुमार आयलानी यांनी घेतली. आयलानी यांच्या आक्रमक भूमिकेने खळबळ उडाली असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आदी बाबत आवाज उठविणार असल्याची प्रतिक्रिया आयलानी यांनी पत्रकारांना दिली.
गेल्या वर्षी धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो नागरिक बेघर झाले. याबाबत समिती गठीत होऊनही निर्णय न झाल्याने, शहरात नाराजीचा सुरू निर्माण झाला. तसेच रस्त्याची दुरावस्था होऊनही राज्य शासन विशेष निधी देत नाही. डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाल्यावरही उसाटणे येथील डम्पिंगचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून सुटत नसल्याची माहिती आमदार आयलानी यांनी पत्रकारांना दिली. आदी प्रमुख मागण्यासह अन्य मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून या समस्या आमदार पदाच्या कालावधीत सुटत नसेलतर, आमदार पदी राहण्याचा हक्क नसल्याचे, आयलानी म्हणाले. आयलानी यांच्या भूमिकेला शहरवाशियानी पाठिंबा दिला. निर्वासितांचे शहर म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. अशी भावना शहरवासीयांत निर्माण झाली आहे.
आयलानीच्या मागणीने शासनाकडे लक्ष
आमदार आयलानी यांनी प्रथमच आक्रमक भूमिका घेतल्याने, पाणी टंचाई, डम्पिंग, धोकादायक इमारती व रस्त्याची समस्या सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले. पावसाळी अधिवेशनात आयलानी लक्षवेधी प्रश्नाद्वारे हे मूलभूत प्रश्न उचलणार आहेत.