मला ९०० खोके दिले आहेत; पण ते विकासकामांसाठी; प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

By अजित मांडके | Published: November 22, 2022 04:35 PM2022-11-22T16:35:03+5:302022-11-22T16:35:11+5:30

आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १८०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

MLA Pratap Sarnaik said that Rs 900 crore was given to me to do the work in my Ovala-Majiwda Assembly Constituency. | मला ९०० खोके दिले आहेत; पण ते विकासकामांसाठी; प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

मला ९०० खोके दिले आहेत; पण ते विकासकामांसाठी; प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

googlenewsNext

ठाणे : मला मुख्यमंत्र्यांनी ९०० खोके दिले आहेत, हो पण ते विकासकामांसाठी दिले असल्याचे मत शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. हे ९०० कोटी माझ्या ओवळा - माजिवडा विधानसभा मतदार संघातील प्रस्ताविक असलेल्या विकासकामांसाठी दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सर्वाधिक निधी देण्यात आलेला माझा मतदार संघ असून विकासाची दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १८०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाण्यासाठी ९०० तर मीरा-भाईंदरसाठी ९०० कोटी देण्यात आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या विकासकांच्या संदर्भात सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन या सर्व महत्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची मागणी त्यांनी केली. पालिका आयुक्तांनीही या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

९०० कोटींमध्ये या कामांचा समावेश

मतदार संघातील विहिरींचे पुनर्जीवन,समाज भवन, मराठा भवन,चार तरण तलावांचा विकास,बाळासाहेब ठाकरे ऍक्वेरियम,विविध प्रकारच्या पाण्याच्या योजना तसेच उद्यानांचा कामांचा देखील समावेश करण्यात आला आहे. येत्या दीड महिन्यात या सर्व कामांच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही

खासदार  संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पडणार असून राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार असून त्यासाठी तयार रहा असे आवाहन त्यांनी केले होते. सरनाईक यांनी राऊत यांचे विधान खोडून काढले असून  हे सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे  राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नसून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. हे सरकार स्थापन होत असताना कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी देवीच्या दर्शनासाठी पुन्हा येणार असल्याचे साकडे घातले होते. त्यामुळे पुन्हा देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरनाईक यांनी विरोधकांवरही टीका केली. विरोधक ५० खोक्यावरून नेहमी टीका करत असताना मात्र विरोधकांच्याच  भाषेत बोलायचं झालं तर मला तर मुख्यमंत्र्यांनी ९०० खोके दिले असून ते माझ्या मतदार संघातील विकासकामांसाठी दिले असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. 

ईडीची कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार

ईडीच्या कारवाईबाबत पूर्व इतिहास तपासून घेणे आवश्यक असून दोन फ्लॅट आणि एक भूखंड जप्तीबाबत नायायालयाच्या निर्णयानुसार कारवाई होत असून यात कोणत्याही पक्षाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सरनाईक यांना छेडले असता यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील.  यापूर्वी मागून मिळत नव्हते मात्र आता न मागता मिळत असल्याचे सांगत सरनाईक यांनी मंत्रिपदाचे संकेत यावेळी दिले आहेत.

Web Title: MLA Pratap Sarnaik said that Rs 900 crore was given to me to do the work in my Ovala-Majiwda Assembly Constituency.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.