भिवंडीत सुरु असलेल्या अवजड वाहतूकीबाबत आमदार रईस शेख आक्रमक; वाहतूक विभागाला दिला रास्ता रोकोचा इशारा
By नितीन पंडित | Published: October 3, 2023 09:51 PM2023-10-03T21:51:35+5:302023-10-03T21:52:43+5:30
अन्यथा मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू अशा प्रकारचे आक्रमक भूमिका घेतली होती.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था व अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी वाहतूक व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी तातडीने बैठक बोलावून अवजड वाहनांना शहरात दुपारी पूर्णतः बंदी घालावी अन्यथा मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू अशा प्रकारचे आक्रमक भूमिका घेतली होती.
भिवंडीत २४ तासात रस्ते अपघातात दोन निष्पापांचा बळी गेल्याने आमदार रईस शेख यांनी शहरातील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयातच वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली होती. सुमारे तीन ते चार तासांहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे, खड्डे व अवजड वाहतूक या विषयी चर्चा करण्यात आली.यावेळी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड,भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे ,पालिका उपायुक्त सचिन माने यांच्यासह मनपा,वाहतूक व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहरातील अवजड वाहतूक दिवसा बंद असल्याचे आदेश ठाणे पोलिस वाहतूक विभागाकडून काढले जातात परंतु ते पायदळी तुडवून या रस्त्यावर चिरीमिरी घेऊन सरार्सपणे अवजड वाहतूक सुरू आहे त्यामुळे या दुर्घटना होत आहेत असा आरोप आमदार रईस शेख यांनी यावेळी केला.तर वाहतूक विभागाने दिवसा बारा ते चार वाजता या दुपारच्या वेळेत अवजड वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रताप केला आहे असे सांगत आमदार शेख यांनी नागरिकांचे जीव महत्वाचे असून पोलिस विभाग भिवंडी शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश काढणार नसेल तर नागरिकांसह मुंबई नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन करू असा इशारा आमदार रईस शेख यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड व भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे व पोलिस अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिला आहे.
तर शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याबाबतचे आदेश काढण्याबाबत आम्ही आश्वासन देऊ शकतो, पण आता त्याबाबतचे आदेश काढण्यात तांत्रिक अडचण आहे असे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी देत ठाणे,मुंबई,वसई - मिरा भाईंदर व नवी मुंबई येथील पोलीस आयुक्तांच्या बैठकीतून त्याबाबत निर्णय होऊन तसे आदेश पारित करता येऊ शकतात आणि त्यामध्ये वेळ जाणार असल्याने आत्ताच तातडीने अवजड वाहतूक बंद करणे शक्य नसल्याची अडचण देखील वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार डॉ.विजय कुमार राठोड यांनी बैठकीत मांडली.