आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश; भिवंडीत २०० बेडच्या माता संगोपन व बाल आरोग्य केंद्राला आरोग्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 06:42 PM2021-06-30T18:42:13+5:302021-06-30T18:52:34+5:30
Bhiwandi News : इंदिरा गांधी रुग्णालयावर ताण पडत असल्याने येथील सेवा सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत.
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी शहरासह ग्रामीण भंगार शासकीय आरोग्य यंत्रणा तितकीशी प्रभावी नसल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. शहरातील रुग्णांसाठी शहरात स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव रुग्णालय असल्याने नागरिकांना उपचारासाठी तसेच महिलांना प्रसूतीसाठी नेहमीच ठाणे, कळवा तसेच मुंबई येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागत असल्याने रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यातच वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण पुढील उपचारासाठी जाताना प्रवासातच दगावल्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच इंदिरा गांधी रुग्णालयावर ताण पडत असल्याने येथील सेवा सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत भिवंडीत इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात २०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्र निर्माण करण्याची लेखी मागणी केली होती. बुधवारी आरोग्यमंत्री टोपे यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्री टोपे यांनी आमदार रईस शेख यांची मागणी मान्य करत भिवंडीत २०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्राला मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी देखील हे प्रकरण केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पाठविण्यात येणार असून त्याचाही पाठपुरावा घेऊन केंद्र शासनाची मंजुरी देखील या केंद्रासाठी लंबवकारात लवकर मिळवून देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे स्वतः पुढाकार घेणार असल्याची माहिती देखील आमदार शेख यांनी दिली आहे. या २०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्रामुळे भिवंडीतील आरोग्य यंत्रणेवरचा ताण निश्चितच कमी होणार असून महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे केंद्र भिवंडीकरांसाठी उपयुक्त ठरणार असल्याने नागरिकांनी आमदार शेख यांचे आभार मानले आहेत.