आमदार रवींद्र चव्हाण यांची डोंबिवलीमध्ये पारंपरिक दहीहंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:32 AM2020-08-13T00:32:10+5:302020-08-13T00:32:21+5:30
प्रतीकात्मक हंडीचा जल्लोष : फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन
डोंबिवली : हिंदू संस्कृती व परंपरेची जपणूक आणि राष्ट्रभक्तीची भावना जोपासण्यासाठी भाजपतर्फे अनेक वर्षे डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात दहीहंडीचा उत्सव साजरा होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे या उत्सवात खंड पडू नये, यासाठी बुधवारी फिजिकल डिस्टन्सिंग पाळून दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी प्रतीकात्मक दहीहंडी उभारून भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
यावेळी चव्हाण म्हणाले की, गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. वृंदावन, मथुरा, पुरी, द्वारका या पुराणकाळातील शहरांत कृष्णावताराचा उत्सव साजरा होतो. आपल्या महाराष्ट्रात विशेषत: कोकणपट्ट्यात दहीकाला-गोपाळकाला दहीहंडीच्या स्वरूपात हा सण साजरा केला जातो. गोपाळकाला शुभ्रधवल रंगाच्या दही, दूध, ताक, लोणी, पोहे यांचा. पोहे मित्रभक्तीचे, दही मातृभक्तीचे, दूध सगुणभक्तीचे, ताक विरोधभक्तीचे, लोणी निर्गुण कृष्णभक्तीचे प्रतीक असल्याचे सनातन धर्म सांगत आहे. भागवत धर्माची पताका अशाच उत्सवांतून विश्वात अनंतकाळ फडकत राहील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे, युवा आघाडीचे मयूरेश शिर्के, पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, जिल्हा सरचिटणीस संजीव बीडवडकर, साउथ इंडियन सेलचे मोहन अय्यर आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.