आमदार रोहित पवार यांची कलानी महालात पप्पु कलानी कुटुंब सोबत बंद दाराआड चर्चा
By सदानंद नाईक | Published: September 22, 2023 06:43 PM2023-09-22T18:43:29+5:302023-09-22T18:43:42+5:30
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी बाप्पाच्या दर्शनानिमित्त कलानी महल मध्ये माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह कुटुंबाची शुक्रवारी दुपारी बंद दाराआड चर्चा केली.
उल्हासनगर : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी बाप्पाच्या दर्शनानिमित्त कलानी महल मध्ये माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह कुटुंबाची शुक्रवारी दुपारी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह ओमी कलानी, पंचम कलानी, मनोज लासी आदींसह स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगरात माजी आमदार पप्पु कलानी यांचे आकर्षण कायम असून खासदार, आमदार व महापालिका निवडणूक वेळी बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी कलानी महलच्या पायऱ्या झिजविल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यावर, शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजी आमदार पप्पु कलानी हे शरद पवार की अजित पवार गटात? अशी अडकले मांडले जात होती. मात्र कलानी कुटुंबानी दोन्ही गटाला लांबच ठेवल्याचे चित्र शहरात होते. दरम्यान ओमी कलानी यांनी स्थापन केलेली टीओके संघटना शहरात सक्रिय झाल्याचे दिसत होते. मात्र त्यांची शरद पवार यांच्याशी जवळीकता लपून राहिली नोव्हती.
राष्ट्रवादीचे युवानेते व आमदार रोहित पवार यांनी बाप्पाच्या दर्शनानिमित्त शुक्रवारी दुपारी लोकल ट्रेनने उल्हासनगरात येऊन कलानी महल गाठले. तेथे बाप्पाचे दर्शन घेतल्यावर, जेवण केले. तसेच पप्पु कलानीसह कुटुंबा सोबत बंद दाराआड चर्चा केल्याचे बोलले जात आहे. दुपारनंतर उल्हासनगर येथून ते कल्याण येथे कार्यक्रमासाठी गेले. कलानी येथील बैठक वेळी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, युवानेते ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी, मनोज लासी यांच्यासह पक्षाचे शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या आठवड्यात पप्पु कलानी यांचा वाढदिवस साजरा झाला असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय स्थानिक नेत्यासह नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आमदार रोहित पवार यांच्या कलानी भेटीने, कलानी कुटुंब शरद पवार यांच्या सोबत असल्याचे उघड झाले. पक्षाचे पदाधिकारी यांनी बोलतांना तसे संकेत दिले.
राजकीय चर्चा नाही...पक्ष प्रवक्ते महेश तपासे
राष्ट्रवादीचे युवानेते व आमदार रोहित पवार यांनी कलानी महल येथे बाप्पाच्या दर्शनाला आले होते. यावेळी जेवणाचा कार्यक्रम झाला. मात्र राजकीय कोणतीही चर्चा झाली नाही. माजी आमदार पप्पु कलानी हे कोणाचे कट्टर समर्थक आहेत. हे राज्यातील नागरिकांना माहीत असल्याचे ते म्हणाले.