शिवसेनेच्या नियुक्त्यांवरून आमदार सरनाईक व पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:14+5:302021-09-21T04:45:14+5:30
मीरा रोड : महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होऊ घातली असताना शिवसेनेतील पद नियुक्त्यांवरून सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकलेले आमदार प्रताप ...
मीरा रोड : महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होऊ घातली असताना शिवसेनेतील पद नियुक्त्यांवरून सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकलेले आमदार प्रताप सरनाईक व मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संघटक यांच्यातील मतभेद आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल पत्र प्रपंचामुळे चव्हाट्यावर आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आलेली पदे सरनाईक यांनी संपर्कप्रमुख या नात्याने रद्दबातल ठरवली आहेत. जिल्हाप्रमुख व जिल्हा संघटक यांनी मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा हवाला देत सर्व नियुक्त्या ग्राह्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
ईडीचा ससेमिरा लागल्यापासून आ. सरनाईक हे अडचणीत आले आहेत. सध्या सर्वसामान्य शिवसैनिक, नागरिक तर सोडाच सेनेचे पदाधिकारी, पत्रकारांनापण त्यांच्याशी थेट संपर्क साधता येत नाही. सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांची थेट शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक मानली जाते. दुसरीकडे सेनेतील महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यातील दुरावासुद्धा सतत चर्चेत असतो.
सरनाईक हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले असून, मीरा भाईंदर शिवसेनेचे ते संपर्कप्रमुख आहेत. महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. आमदार सरनाईकांना मात्र शिवसेनेला सत्तेच्याजवळदेखील नेता आले नाही. महापालिका व संघटनेत सरनाईक यांनी स्वतःचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक असले तरी, यातूनच गटबाजीसुद्धा वाढत चालली आहे. ईडीच्या फेऱ्यात सरनाईक अडकले असतानाच, दुसरीकडे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे व जिल्हा संघटक स्नेहल सावंत यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते अनेकांना शिवसेनेतील पदांची नियुक्तिपत्रं वाटप केली आहेत.
विद्या कदम, जयलक्ष्मी सावंत, प्राची पाटील यांची महिला उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आहे. उपशहर संघटक, विभाग प्रमुख आदी अन्य पदेसुद्धा देण्यात आली आहेत. या पदांच्या नियुक्तीवरून सरनाईक व त्यांचे समर्थक नाराज आहेत. सरनाईक यांनी म्हात्रे व सावंत याना पत्र लिहून त्याच्या प्रती पक्षनेत्यांना पाठवल्या आहेत. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आला आहे.
...जोड आहे