भिवंडीतील जिल्हा कोविड रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:22 PM2021-04-15T17:22:32+5:302021-04-15T17:22:41+5:30
सध्या भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णानाची संख्या झपाट्याने वाढत असतांना देखील हे रुग्णालय लोकार्पण व उदघाटन सोहळ्यानंतरही ऐन गरजेच्यावेळी बंद असल्याने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते
नितिन पंडीत
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची मोठी अडचण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे येथील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने भिवंडीतील सवाद येथे ८१८ बेडच्या भव्य अशा जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे . मात्र उदघाटनाच्या २० दिवसानंतरही हे रुग्णालय बंद असल्याने रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागरिकांच्या या गैरसोयीची दखल भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी घेतली असून लवकरात हे कोविड जिल्हा रुग्णालय सुरु करण्यात यावे त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ व औषध पुरवठा तत्काळ या रुग्णालयाला करण्यात यावा अशी मागणी आमदार शेख यांनी राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णानाची संख्या झपाट्याने वाढत असतांना देखील हे रुग्णालय लोकार्पण व उदघाटन सोहळ्यानंतरही ऐन गरजेच्यावेळी बंद असल्याने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते त्यामुळे नागरिकांना कोरोनावरील उपचार घेतांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची बाब आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली आहे.
सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय एकूण २ लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत बनविण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात ३६० महिला ३७९ पुरुष ऑक्सीजन बेड असून तर ८८ अतिदक्षता बेड, ज्यात विभागात २० व्हेंटिलेटर , २० बायपॅक व ४० हाय फ्लो नेझल कॅनुला ऑक्सिजन थेरपी असे सर्व सोयी सुविधा असलेले एकूण ८१८ बेड आहेत हे सर्व बेड ऑक्सिजनयुक्त बेड अशा सर्व सोयी सुविधा असलेले हे भव्य जिल्हा कोविड रुग्णालय जिल्हा प्रशासनाने उभारले आहे मात्र उदघाटन होऊन २० दिवसांनातरही ऐन गरजेचे वेळी हे रुग्णालय बंद असल्याने वाढत्या कोरोना संकटात नागरिकांना कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे त्यातच आता कडक निर्बंधांमुळे येथील नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे त्यामुळे हे रुग्णालय लवकरात लवकर सुरु करावे व नागरिकांना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.