बालकांसाठीचा कोरोना वॉर्ड बांधकाम विभागामुळे रखडल्याने आमदार संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:52 PM2021-05-26T17:52:07+5:302021-05-26T17:59:06+5:30
Miraroad News : लहान मुलांसाठी कोरोना उपचार वॉर्ड सुरु करण्याचे नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र लहान मुलांसाठीच वॉर्ड सुरूच झाला नाही.
मीरारोड - पालकमंत्री एकनाथ शिंदे गेल्या आठवड्यात आले असता त्यावेळी महापालिकेने लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड सुरू केल्याचा गाजावाजा केला होता. परंतु पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने किरकोळ कामांसाठी दिरंगाई केल्याने बालकांसाठी वॉर्ड सुरु न झाल्याने आमदार गीता जैन या अधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापलेल्या दिसून आल्या. भाईंदर पश्चिमेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार केले जातात. त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आल्यावर त्याचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात झाले होते. त्यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट आणि लहान बालकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका पाहता जोशी रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरु केल्याचा गवगवा महापालिकेने त्यावेळी केला होता.
डॉ . नरेश गीते आयुक्त असताना त्यांनी लहान बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र सुरु केले होते. त्याच ठिकाणी आता हा लहान मुलांसाठी कोरोना उपचार वॉर्ड सुरु करण्याचे नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र लहान मुलांसाठीच वॉर्ड सुरूच झाला नाही. दरम्यान कोरोनाचे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण शहरात आढळून आले असताना त्यांना सामान्य वॉर्ड मध्येच ठेवण्यात आले. हा प्रकार गीता जैन यांना समजला असता त्यांनी वैद्यकीय समितीचे सदस्य माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवालसह जोशी रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी लहान मुलांचा वॉर्ड सुरु झाला नसल्याचे आढळले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लहान मुलांच्या वॉर्डमध्ये वातानुकूलित यंत्र, मुलांसाठी वॉश बेसिन आदी सुविधा बांधकाम विभागाने करून दिल्या नसल्याने मुलांसाठी वॉर्ड सुरू केला गेला नसल्याचे गीता यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आमदार गीता जैन संतापल्या व त्यांनी कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व उपअभियंता नितीन मुकणे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत कामे वेळेत पूर्ण होत नसल्याबद्दल त्यांची कानउघाडणी केली. मुकणे स्वतः जोशी रुग्णालयात आले. त्यावेळी आवश्यक आमी दोन दिवसांत पूर्ण करून देऊ असे आश्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले.