आमदारांनी घातली पोलिसांशी हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:40 AM2018-10-19T00:40:06+5:302018-10-19T00:40:08+5:30
कल्याण : गरबा खेळण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गरबा आयोजकाला जबाबदार धरत त्याला चौकशीसाठी ताब्यात ...
कल्याण : गरबा खेळण्यासाठी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गरबा आयोजकाला जबाबदार धरत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी हा अपघात आणि आयोजकांचा काय संबंध, असा जाब पोलिसांना विचारला. कारवाई करताना आमदारांनी आपल्याशी हुज्जत घालत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदाराविरोधात स्टेशन डायरीमध्ये नोंद केली आहे.
पूर्वेतील मेट्रो मॉल परिसरात नवरात्रीनिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे गर्दी होत असल्याने वाहनचालक पत्रीपूल येथील वळसा टाळण्यासाठी नेतिवली येथून विरुद्ध दिशेने वाहन चालवत होते. मंगळवारी रात्री तेथे एका रिक्षाला अपघात झाला. कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी चौकशीला सुरुवात केली. मात्र, गरबा खेळण्यास जाताना अपघात झाल्याचे अपघातग्रस्त व्यक्तीने सांगितले. त्यानुसार गरबा आयोजकाला जबाबदार धरत पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी आयोजकांनी आपला दोष नसल्याचे सांगितले. मात्र, पोलीस कारवाईवर ठाम असल्याने आयोजकांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. आमदारांनी पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न करत आयोजकांचा काय दोष, असा प्रश्न केला. याच दरम्यान, पोलीस आणि गायकवाड यांच्यात वाद झाला. याप्रकरणी गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.