मीरा-भाईंदर मेट्रोतून दोन स्थानकं वगळली, राजकीय लाभासाठी नावांना कात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 01:13 PM2018-12-19T13:13:55+5:302018-12-19T13:15:29+5:30

एमएमआरडीएने भाईंदर पूर्वेच्या सावरकर चौकातून नवघर-इंद्रलोकपर्यंत जाणारा मेट्रो मार्ग रद्द केल्याचे समोर आले आहे.

MMRDA dropped two stations from the metro of Mira Bhayandar | मीरा-भाईंदर मेट्रोतून दोन स्थानकं वगळली, राजकीय लाभासाठी नावांना कात्री

मीरा-भाईंदर मेट्रोतून दोन स्थानकं वगळली, राजकीय लाभासाठी नावांना कात्री

Next

मीरा रोड - दहिसर पूर्व ते भाईंदर पश्चिम या मेट्रो 9 प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाले असले तरी सदर एमएमआरडीएने भाईंदर पूर्वेच्या सावरकर चौकातून नवघर-इंद्रलोकपर्यंत जाणारा मेट्रो मार्ग रद्द केल्याचे समोर आले आहे. यामुळे न्यूगोल्डन नेस्ट, इंद्रलोक, गोडदेव, नवघर गाव भागातील लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवाय राजकीय फायद्यासाठी महापुरुषांची नावं देण्याच्या प्रकारांना एमएमआरडीएने कात्री लावत स्थानिक परिसरानुसार नावे ठरवली आहेत.

आधी अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व या मेट्रो 7 प्रकल्पातच विस्तारीकरण करून मीरा-भाईंदरपर्यंत मेट्रो आणणार असे दावे केले जात होते . इतकेच काय तर डिसेंबर 2017मध्ये काम सुरू होणार, अशी पालिका निवडणुकीत घोषणा केली गेली होती. परंतु एमएमआरडीएच्या 2018-19च्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रोसाठी तरतूदच नसल्याचे लोकमतने उघड केल्यावर राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली . सत्ताधारी भाजपावर शिवसेना, काँग्रेस आदींनी टीकेची झोड उठवत सेनेने तर मेट्रोचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार, असा पवित्रा घेतला.

अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रोला मान्यता देत कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याआधी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एमएमआरडीएनेच पालिकेला पत्र देऊन 9 मेट्रो स्थानकांच्या नावांची माहिती दिली होती. ज्यात पांडुरंग वाडी, अमर पॅलेस, झंकार कंपनी, साईबाबा नगर, दीपक हॉस्पिटल, पालिका क्रीडा संकुल, इंद्रलोक, शहीद भगतसिंग उद्यान व नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम या नावांचा त्यात समावेश होता .

त्यावेळी सत्ताधारी भाजपाने महासभेत पांडुरंग वाडी ऐवजी पेणकर पाडा, अमर पॅलेसऐवजी मीरा गाव, झंकार कंपनी ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा नगर ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल, दीपक रुग्णालय ऐवजी नानासाहेब धर्माधिकारी, पालिका क्रीडा संकुल ऐवजी महाराणा प्रताप, इंद्रलोक ऐवजी नवघर, शहीद भगतसिंह ऐवजी महावीर स्वामी तर सुभाषचंद्र बोस ऐवजी बालयोगी सदानंद महाराज अशी नावं बदलून तसा ठराव केला होता. शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांनी मात्र क्रीडा संकुलास गोडदेव, साईबाबा नगरला ब्रह्मदेव मंदिर व शहीद भगतसिंग यांचे नाव ठेवा अशी मागणी केली होती. गोडदेव नावासाठी तर गावातील स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

परंतु एमएमआरडीएने भूमिपूजन निमित्त केलेल्या जाहिराती व पत्रकात मात्र पांडुरंग वाडी, मीरा गाव, काशिगाव, साईबाबा नगर, मेडतिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन व सुभाषचंद्र बोस स्टेडियम अशी स्थानकांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे राजकीय फायद्यासाठी महापुरुषांची नावं स्थानकाला देण्याच्या राजकारणाला मुख्यमंत्र्याच्या एमएमआरडीएनेच कात्री लावली आहे.

भाईंदरच्या सावरकर चौकातून मेट्रो इंद्रलोक - नवघरकडे न वळता भाईंदर पश्चिमेला भगतसिंग उद्यान व बोस स्टेडियमकडे सरळ जाणार असल्याने भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट, इंद्रलोक, गोडदेव, नवघर भागातील लोकांना मेट्रोतून वगळण्याची भावना निर्माण झाली आहे. लोकांमध्ये नाराजी असली तरी सदरचा मार्ग प्रत्यक्षात संयुक्तिक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

परंतु मेडतिया नगर या प्रस्तावित मेट्रो स्थानकाच्या नावामुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण येथे अजून तसं प्रसिद्ध असं नगर वा वसाहतच नाही. वास्तविक येथील मुख्य चौकास स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नाव असल्याने मेडतिया नगर ऐवजी सावरकर यांचे नाव संयुक्तिक ठरले असते असे लोकांचे म्हणणे आहे. तर भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन मेट्रोचे स्वप्न साकार कधी होणार, असा सवाल लोक करत आहेत. पण लोकांच्या या प्रश्नाचे उत्तर अजून तरी देण्यास कोणी समोर आलेले नाही.

Web Title: MMRDA dropped two stations from the metro of Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो