एमएमआरडीए अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:27 AM2019-04-22T02:27:46+5:302019-04-22T02:27:57+5:30
रस्ता रूंदीकरण, काँक्रिटीकरणाचे काम सुरू; कांदळवनाचा केला ऱ्हास
मीरा रोड : भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानापासून मोर्वापर्यंत एमएमआरडीएने चालवलेल्या रस्त्याच्या कामास केंद्राच्या मीठ विभागाने जागेच्या मालकीवरून घेतलेला आक्षेप, मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड, अर्धवट चाललेले काम यावरून टीका होत असतानाच या कामामुळे कांदळवन क्षेत्राचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. या जागी कांदळवनाचा ºहास झाल्याप्रकरणी आधी गुन्हा दाखल झाला असतानाही या क्षेत्रात काम केले जात असल्याने हे काम थांबवून कंत्राटदार आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
विकास आराखड्यात असलेल्या भार्इंदर पश्चिमेस बोस मैदानापासून मोर्वापर्यंतच्या ३० मीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी घाईघाईने खोदकाम व काँक्रिटीकरणाचे काम कंत्राटदार करत आहे. सध्या जिकडे मोकळी जागा मिळेल, तिकडे खोदकाम करून रस्ताबांधणी सुरू आहे. मुर्धा, राई, मोर्वा गावांत अनेक ठिकाणी जुनी घरे व अन्य बांधकामे असून रहिवाशांचा विरोध पाहता तिकडे तूर्तास रस्ता रुंदीकरणाचे काम टाळले आहे.
रुंदीकरणासाठी मोठी जुनी झाडे तोडली आहेत. ही झाडे तोडताना पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती नसताना तसेच न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले गेले आहे. एमएमआरडीएने रस्ता रुंदीकरणासाठी केंद्र सरकारच्या मीठ विभागाच्या जागेवरच काम सुरू केले आहे. काम करण्यासाठी कोणतीही परवानगी एमएमआरडीए वा पालिकेने मीठ विभागाची घेतलेली
नाही.
मीठ विभागाचे अधीक्षक राजेंद्र सिंह यांनी लेखी तक्रार महापालिका, पोलीस ठाणे आदींकडे करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. मीठ विभागाच्या जमिनीची मालकी असतानाच दुसरीकडे सीआरझेडमध्ये काम चालवले असताना त्याचीही परवानगी घेण्यात आल्याबद्दल साशंकता आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे बोस मैदानासमोर व पुढे मुर्धा खाडीपर्यंतच्या मार्गावर दाट कांदळवन असून भराव केल्याप्रकरणी सरकारनेच महापालिका कंत्राटदारासह डम्परचालकाविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कांदळवन व त्यापासून ५० मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करण्यास कायद्याने मनाई आहे. उच्च न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. तर, ज्या ठिकाणी कांदळवनात भराव, बांधकामे झाली आहेत, ते काढून पूर्वीसारखे करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे.
असे असतानाही थेट कांदळवनात खोदकाम व रस्त्याचे बांधकाम केले जात असल्याने एमएमआरडीएकडूनच पर्यावरणाचा ºहास होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. एमएमआरडीएचे अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करून यंत्रसामग्री जप्त करण्याची मागणी दुष्यंत भोईर यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांकडून डोळेझाक : कांदळवनात राजरोस बेकायदा काम सुरू असताना मंडळ अधिकारी, तलाठी डोळेझाक करून कंत्राटदाराचा फायदा पाहत असल्याने त्यांना निलंबित करून सहआरोपी करण्याची मागणी प्रदीप जंगम यांनी केली आहे. तर, पालिकेचे प्रभाग अधिकारी गोविंद परब यांनी घटनास्थळी जाऊन कांदळवनात काम करण्याबाबतची परवानगी विचारली असता ती नसल्याचे कंत्राटदाराच्या कर्मचाºयाने सांगितले.