मिरा-भार्इंदर उन्नत मार्गासाठी एमएमआरडीएचे २५६ कोटी कर्ज
By admin | Published: October 16, 2015 02:57 AM2015-10-16T02:57:30+5:302015-10-16T02:57:30+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील वीर सावरकर चौक ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ असा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असून या रस्त्यावर ८ सिग्नल असल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे
अजित मांडके, ठाणे
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील वीर सावरकर चौक ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ असा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असून या रस्त्यावर ८ सिग्नल असल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे. तसेच येथून जाण्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला आहे. आता या मार्गावर उन्नत मार्ग व अंडरबायपास उभारण्यासाठी एमएमआरडीए २५६.३४ कोटींचे कर्ज देणार असून त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या मार्गातील कोंडी फुटून वाहतूकदारांचा वेळही वाचणार आहे.
सध्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यास ४५ मिनिटांहून अधिक कालावधी लागतो. या समस्येवर उपाय करण्यासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेने या मार्गावर सिग्नलच्या ठिकाणी उन्नत मार्ग व अंडरबायपास उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यामध्ये भार्इंदर (पू.) भागातील वाहनांना जाण्यासाठी वीर सावरकर चौक (गोल्डन नेस्ट सर्कल) व दीपक हॉस्पिटल जंक्शन येथे उन्नत मार्ग (फ्लायओव्हर ब्रीज) बांधणे, सिल्व्हर पार्क जंक्शन व प्लेझंड पार्क जंक्शन येथे अंडरपास बांधणे, एसके स्टोन जंक्शन, कनकिया जंक्शन व शिवार उद्यान जंक्शन (एन.एच. हायस्कूल रस्ता व सरदार पटेल रस्ता) या ठिकाणी एक उन्नत मार्ग बांधणे, काशिमीरा नाक्यावर पादचारी पूल बांधणे आदी कामे यात प्रस्तावित केली आहेत.
या प्रकल्पासाठी २५६.३४ कोटींचा खर्च अपेक्षित असून तो २ ते ३ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता या प्रकल्पासाठी होणारा खर्च शक्य नसल्याने त्यासाठी शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१४ रोजी मंजूर केला होता. तर, आयुक्तांनी यासाठी एमएमआरडीएकडून कर्ज घेण्यास शासनाची मान्यता मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, आता शासनाने याला मान्यता दिल्याने या उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे.