एमएमआरडीएची स्वच्छतागृहे आता पालिकेकडे
By admin | Published: July 17, 2017 01:08 AM2017-07-17T01:08:49+5:302017-07-17T01:08:49+5:30
एमएमआरडीएने बांधलेल्या स्वच्छतागृहांवर आता महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. महापालिकेने त्यांच्या देखभालीसाठी पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : एमएमआरडीएने बांधलेल्या स्वच्छतागृहांवर आता महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. महापालिकेने त्यांच्या देखभालीसाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत देखभाल करणाऱ्या समाजसेवी संघटनेला करारनाम्यासह २५ जुलैपर्यंत शहर अभियंत्यांना भेटण्यास सांगितले आहे.
उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी एमएमआरडीएने ३२ कोटींच्या निधीतून तीन टप्प्यांत १८० स्वच्छतागृहे बांधली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाला. निकृष्ट बांधलेली स्वच्छतागृहे काही वर्षांतच धोकादायक झाली. तीसपेक्षा अधिक स्वच्छतागृहे वापराविना पडून आहेत. स्वच्छतागृहाची निगा राखण्यासाठी समाजसेवी संघटनेला एमएमआरडीएने चालवण्यासाठी दिली. मात्र, नागरिकांकडून म्हणावे तसे सहकार्य न मिळाल्याने देखभाल संस्थेला करता आली नाही. अखेर, महापालिकेने वीज व पाणीपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून दरमहा दोन हजार संस्थेला अनुदान देण्यास सुरुवात केली.
शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी बांधलेली एमएमआरडीएची स्वच्छतागृहे शहरासाठी डोकेदुखी ठरली आहेत. स्वच्छतागृहे ही गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे. तर, काही स्वच्छतागृहांत हाणामारी, अत्याचार व विनयभंगांचे प्रकारही घडले आहेत. अखेर, पालिकेने स्वच्छतागृहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी दिली. स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी या निर्णयाचा महापालिकेला फायदा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून पालिकेने वैयक्तिक स्वच्छता केंद्रांवरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी प्रत्येक स्वच्छतागृहाला २२ हजारांचे अनुदान देण्यात आले.