मीरा भाईंदर मनसे शहराध्यक्ष नियुक्ती विरोधात मनसैनिक एकवटले
By धीरज परब | Published: February 13, 2024 07:24 PM2024-02-13T19:24:34+5:302024-02-13T19:26:17+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष पदी अन्य पक्षातून आलेले संदीप राणे यांच्या नियुक्ती विरोधात शहरातील मनसैनिकांनी व ...
मीरारोड - मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष पदी अन्य पक्षातून आलेले संदीप राणे यांच्या नियुक्ती विरोधात शहरातील मनसैनिकांनी व आजी - माजी पदाधिकारी यांनी एकत्र येऊन मीरारोडच्या एका सभागृहात सभा घेतली. त्यात अनेक मनसैनिकांनी आपले अनुभव आणि नाराजी व्यक्त करत शहर अध्यक्ष बदलण्याची मागणी केली.
मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष पदी संदीप राणे यांची नियुक्ती केली गेली. अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते राणे यांना नियुक्ती पत्र दिल्यानंतर शहरातील अनेक मनसैनिकांनी राणे यांच्या नियुक्ती बद्दल आश्चर्य तसेच नाराजी व्यक्त केली होती.
मनसेचे शहर अध्यक्ष आणि विद्यार्थी सेनेपासून राज यांच्याशी एकनिष्ठ असलेले हेमंत सावंत यांना अनेक पदाधिकारी व मनसैनिकांनी भेटून राणे यांच्या नियुक्तीचा निषेध करत राजीनामे देण्याची तयारी दाखवली होती. परंतु आधी राज ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरले मात्र अद्याप राज यांची भेट नाराज मनसैनिकांना मिळू न शकल्याने भेट न होऊ देण्या मागे देखील जिल्ह्यातील नेत्याचा हात असल्याचे सांगितले जाऊ लागले.
दरम्यान नाराज मनसैनिकांनी मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप जवळील सभागृहात रविवारी सभा घेतली. त्या मध्ये माजी शहर अध्यक्ष हेमंत सावंत सह महिला उपजिल्हाध्यक्ष पुतुल अधिकारी, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रॉबर्ट डिसोझा, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन पोपळे, शहर संघटक दिनेश कनावजे व शशी मेंडन, उपशहर अध्यक्ष रमाकांत माळी, गिरीश सोनी, मेहबूब शेख, अभिनंदन चव्हाण, मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष वैशाली येरुणकर, विभाग अध्यक्ष रत्ना गुप्ता, संगीता राठोड, कामगार सेनेचे शेखर जाधव आदी विविध पदाधिकारी मिळून सुमारे २०० जण उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी संदीप राणे यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवत राणे हे मुळात शहरात रहात नसून नुकतेच पक्षात आले व त्यांना अनेक महत्वाची पदे दिली. सिनेटचे ३ तर पदवीधर चे केवळ १२ अर्ज भरले. मनसेच्या नावाखाली स्वतःची मनमर्जी करण्यासह सोयीनुसार काम करत असल्याचा आरोप करत काहींनी काही प्रकरणात प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे मनसेतील अंतर्गत वादंग चव्हाट्यावर आला असून ह्या नियुक्तीमुळे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याबद्दल सुद्धा नाराज असल्याची भावना काहींनी बोलून दाखवली.