टोलमुक्तीसाठी मनसे पुन्हा आक्रमक, मानवी साखळीद्वारे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 01:11 PM2019-11-16T13:11:38+5:302019-11-16T13:12:38+5:30
आनंदनगर टोल नाका ते कोपरी ब्रिजपर्यंत ही मानवी साखळी करण्यात आली होती.
ठाणे - टोल मुक्तीसाठी ठाण्यात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली असून आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, यासाठी मानवी साखळी करून मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ नंबर असणाऱ्या वाहनांकडून टोल घेण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, अजूनही ठाणेकरांकडून टोल घेणे सुरूच असून आमदार जनतेशी खोटं बोलत आहेत असा आरोपही मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
आनंदनगर टोल नाका ते कोपरी ब्रिजपर्यंत ही मानवी साखळी करण्यात आली होती. भविष्यात ही मानवी साखळी टोल नाक्यापासून ते थेट माजिवडा पर्यंत करण्यात येईल असे सांगत यापुढे ठाणेकरांना टोल मुक्त करण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे . मात्र या टोलच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपमध्ये मात्र संघर्षाची ठिणगी पडली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या आनंदनगर टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असल्याने या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आनंदनगर टोल नाका पार करायला जिथे १० मिनिटांचा वेळ अपेक्षित आहे त्या ठिकाणी पाऊणतास वाहन चालकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागते . विशेष म्हणजे ठाणेकरांना तर या टोल नाक्याचा प्रचंड त्रास गेले अनेक वर्ष होत असून केवळ केवळ ठाण्यातून मुलुंडच्या हद्दीमध्ये जाण्यासाठी टोल द्यावा लागत असल्याने ठाणेकरांवर हा अन्याय असल्याची ठाणेकरांची भावना आहे. टोलच्या या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली असून सकाळी आनंदनगर टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यानी जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करून आंदोलन केले . मनसेचे आंदोलन असल्याने टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. मानवी साखळी करून एमएच०४ वाहनांना टोल बंद करावा या आशयाचे फलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले. यापूर्वी काही सामाजिक संघटनांच्या वतीने देखील टोल मुक्तीसाठी अशाप्रकारचे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते.
ज्यावेळी २०१४ साली शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा त्या सरकारने टोल मुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र हे केवळ आश्वासनच ठरले. जनतेला टोल नको असल्याने मनसेने आता आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन छेडले असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. ८ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच०४ या वाहनांना टोलमुक्त केले असल्याचे जाहीर केले होते. तशाप्रकारच्या बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र आमदार देखील खोटं बोलत असल्याचे आरोप जाधव यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे टोलच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपमध्ये देखील संघर्ष निर्माण झाला आहे. ठाण्यात राहत असलेल्या नागरिकांना अर्ध्या किमीसाठी टोल भरावा लागत असून हे अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया ठाणेकर दर्शन देशमुख यांनी दिली आहे . जिथे १० मिनिटांचे अंतर लागते तिथे या टोल नाक्यामुळे ४५ मिनिटांचे अंतर लागत असून घरी जायला रोज उशीर होतो. त्यामुळे निदान ठाणेकरांसाठी तरी हा टोल बंद करावा ही मनसेची मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आधीच ठाणे महापालिकेला कर रूपाने पैसे भरतो. मात्र आज ठाण्याच्या रस्त्यांची काय अवस्था आहे हे सर्वाना माहित आहे . जर सेवाच चांगली नसेल तर मग टोल तरी का द्यायचा, त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.