बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसे आक्रमक, ठाण्यात तीन कुटुंबाना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 09:36 PM2020-02-13T21:36:40+5:302020-02-13T21:37:32+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आझाद मैदान येथे झालेल्या सभेत बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.
ठाणे - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आझाद मैदान येथे झालेल्या सभेत बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर आता मनसैनिक बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक झाले आहेत. ठाण्यात अवैधरीत्या राहत असलेल्या तीन बांगलादेशी कुटुंबांना आज मनसैनिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ठाण्यातील किंगकाँगनगर येथे राहणाऱ्या तीन बांग्लादेशी कुटुंबाना पकडून मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. स्थानिकांकडून याची माहिती मिळताच अविनाश जाधव आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत सादर ठिकाणी पोहोचले. त्यानंतर येथे राहणाऱ्यांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड असल्याची माहिती समोर आली. मात्र बांगलादेशी असल्याची कबुली या लोकांनी दिल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतील, याचा देखील पाठपुरावा करणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, येथून ताब्यात घेण्यात आलेल्या एका महिलेच्या आईकडे व्हिजिटर व्हीसा देखील सापडला आहे. तसेच या परिसरात एकूण ५० बांगलादेशी कुटुंबे राहत असल्याची माहिती मिळाल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.