शाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या निषेधार्थ मनसेचे भीक मागो आंदोलन; जमा झालेले पैसे पालिकेला देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:09 PM2022-02-18T17:09:05+5:302022-02-18T17:11:54+5:30

जमा झालेली १ हजार ८४० रुपयांची रक्कम महापालिकेला डीडी करून पाठविणार असल्याची माहिती मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.

MNS agitation against school lease; The money collected will be given to the municipality in ulhasnagar | शाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या निषेधार्थ मनसेचे भीक मागो आंदोलन; जमा झालेले पैसे पालिकेला देणार

शाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या निषेधार्थ मनसेचे भीक मागो आंदोलन; जमा झालेले पैसे पालिकेला देणार

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर - महापालिका शाळा खाजगी संस्थेला नाममात्र १ रुपया भाडेतत्त्वावर देण्याच्या ठरावाच्या निषेधार्थ मनसेने शिवाजी चौकात भीक मागो आंदोलन केले. जमा झालेली १ हजार ८४० रुपयांची रक्कम महापालिकेला डीडी करून पाठविणार असल्याची माहिती मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१९ व २७ ह्या खाजगी संस्थेला नाममात्र १ रुपया किंमतीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव गेल्या महासभेत मंजूर झाला. या ठरावाला मनसेने सुरुवातीपासून विरोध करून गोर-गरीब व गरजू मुलांचे शैक्षणिक भविष्य खराब करू नका. असे निवेदन मनसेने सर्वपक्षीय नेत्यांना व महापालिका आयुक्तांना दिले. 

शिवसेनेचे धनंजय बोडारे, शिक्षण विभागाच्या माजी सभापती शुभांगी बहेनवाल आदी मोजक्याच नगरसेवकांनी ठरावाला विरोध केला. शाळा भाडेतत्वावर देण्याचा ठराव खंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी मनसेने महापालिकेला केली. दरम्यान शुक्रवारी महापालिका महासभा असल्याचे औचित्य साधून मनसेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ वाजता भीक मागो आंदोलन केले. यावेळी जमा झालेली १ हजार ८४० रुपयांची रक्कम महापालिकेला पाठविणार असल्याची माहिती शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.

मनसेच्या भीक मागो आंदोलनात शहाराध्यक्ष बंडू देशमुख, माजी शहाराध्यक्ष संजय घुगे, मनोज शेलार, मैनुद्दीन शेख, सागर चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो पर्यंत शाळा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव रद्द होणार नाही. तोपर्यत मनसे विविध मार्गांनी आंदोलन करणार असल्याची माहिती बंडू देशमुख यांनी दिली. शाळांची पुनर्बांधणी करून काही शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या व इयत्ता आठवीचा वर्ग पालिकेने सुरू केल्यास महापालिका शाळेला पूर्वीचे वैभव येणार असल्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
 

Web Title: MNS agitation against school lease; The money collected will be given to the municipality in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.