मनसेचे घंटानाद, आरती आंदोलन करून शिवसेनेवर टिकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 05:06 PM2018-11-24T17:06:05+5:302018-11-24T17:08:31+5:30
पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तथा महानगरपालिकेतील सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरले असताना केवळ निवडणूकीच्या तोंडावर लोकांच्या भावनांशी खेळ करण्याचा घाट या शिवसेना भाजपने सातत्याने मांडला आहे.
डोंबिवली - कल्याण डोंबिवली क्षेत्रातील नागरीसुविधांची वाताहत झाली आहे. कोणत्याही प्रकारची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तथा महानगरपालिकेतील सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरले असताना केवळ निवडणूकीच्या तोंडावर लोकांच्या भावनांशी खेळ करण्याचा घाट या शिवसेना भाजपने सातत्याने मांडला आहे. त्याचा निषेध म्हणून डोंबिवली मनसेने चक्क प्रभु श्रीरामालाच साकडं घातले. या महापालिकेत २४ वर्षे सत्ता उपभोगूनही येथील जनतेला जो वनवास भोगावा लागला आहे त्याचे काय? असा सवाल करत शनिवारी डोंबिवली शहर मनसेने बाजीप्रभू चौकातील राममंदिरामध्ये घंटानाद, आरत्या करत शिवसेनेवर टिका केली.
भावनिक राजकारण करणाऱ्या डोंबिवली शहराच्या वतीने शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, जिल्हाध्यक्ष, गटनेते प्रकाश भोईर, राहुल गणपुले, प्रकाश माने, मंदा पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते मंदार हळबे, नगरसेविका सरोज भोईर, जिल्हा संघटक राहुल कामत, प्रल्हाद म्हात्रे, सुदेश चुडनाईक, शहर संघटक मनोज राजे, सचिव कोमल पाटील, सागर जेधे , अरुण जांभळे, सुभाष कदम आदींसह महिला सेना विद्यार्थी सेना, सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.