कल्याणमध्ये अदृश्य पत्रीपुलाचे उद्घाटन करून मनसेने केले आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:13 PM2020-03-08T23:13:33+5:302020-03-08T23:13:48+5:30
कल्याणकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाºया पत्रीपुलाचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहतूककोंडीचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागत आहे.
कल्याण : पत्रीपुलाच्या कामाच्या पूर्णत्वासाठी दिलेली फेब्रुवारी २०२० ही तारीख उलटून गेली, तरी अद्याप कामाला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यात भाजपतर्फे धरणे आंदोलन छेडले गेले होते. रविवारी मनसेनेही उपहासात्मक आंदोलन करून मुदतीत काम पूर्ण न केल्याने सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. काळे फुगे, जोडीला फटाके आणि निषेधाच्या घोषणा देत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अदृश्य पत्रीपुलाचे उद्घाटन केले.
कल्याणकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाºया पत्रीपुलाचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहतूककोंडीचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागत आहे. जाणीवपूर्वक या पुलाच्या कामाला विलंब लावण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मागील मंगळवारी भाजपतर्फे छेडल्या गेलेल्या धरणे आंदोलनात केला होता. त्यावेळी भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. रविवारीही मनसेने आंदोलनादरम्यान शिवसेनेवर हल्लाबोल केला. आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये पत्रीपूल पूर्ण होण्याचे आश्वासन सेनेतर्फेदेण्यात आले होते. त्याची मुदत उलटूनही अद्याप पत्रीपूल सुरू झाला नसल्याच्या निषेधार्थ छेडण्यात आलेले अनोखे उपहासात्मक आंदोलन मनविसे शहराध्यक्ष विनोद केणे आणि विभागाध्यक्ष कपिल पवार यांच्या संकल्पनेतून छेडले गेले.