महावितरणविरोधात कल्याणमध्ये मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:20+5:302021-03-16T04:40:20+5:30
कल्याण : वाढीव वीजबिले ग्राहकांनी न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ‘महावितरण’कडून सुरू आहे. त्याविरोधात मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ...
कल्याण : वाढीव वीजबिले ग्राहकांनी न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ‘महावितरण’कडून सुरू आहे. त्याविरोधात मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी कल्याण-टाटानाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयात धाव घेऊन अधिकाऱ्यांच्या केबिनमधील वीज गुल केली. तसेच त्यांना मेणबत्ती भेट दिली. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवली नाही, तर यापुढे कार्यालय पेटवून दिले जाईल, असा सज्जड इशाराही दिला आहे.
‘महावितरण’ने लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिले पाठविली होती. लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. काहींच्या हाताला काम नव्हते, तसेच काहींची पगारकपात झाली होती. आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी ‘महावितरण’ने वाढीव वीजबिलांचा शॉक दिला. वाढीव वीजबिलांविरोधात मनसे आणि भाजपने वेळोवेळी आंदोलने केली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढीव वीजबिलांप्रकरणी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, ‘महावितरण’ ग्राहकांना वाढीव बिले भरण्याची सक्ती करत आहे. बिल न भरल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. सध्या उन्हाळा वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. तसेच वीज खंडित केल्यास विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास कसा करणार, अशा विविध समस्या आहेत. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे, अनंता गायकवाड, निर्मल निगडे, महेंद्र कुंदे यांनी टाटानाका येथील ‘महावितरण’वर धडक दिली. तेथील अधिकाऱ्यांच्या केबिनमधील दिवे कार्यकर्त्यांनी बंद केले. विनापंखा, लाइट काम कसे करतात. घामाच्या धारा कशा निघतात, याची प्रचीती यावेळी अधिकाऱ्यांना मनसेने आणून दिली. पाऊण तास मनसेचे पदाधिकारी केबिनमध्ये चर्चा करत होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मेणबत्ती भेट दिली. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई न थांबवल्यास कार्यालय पेटवून देऊ, असा त्यांनी दम भरला आहे.
---------------