खाजगी लॅबमध्ये टेस्ट न केल्यास दुकाने सील करणार असल्याची पालिकेची जबरदस्ती केल्याचा मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:35 PM2020-07-29T17:35:00+5:302020-07-29T22:06:00+5:30
खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट करण्याचा पालिकेचा अट्टाहास का असा सवाल मनसेने केला आहे.
ठाणे : खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट न केल्यास तुमची दुकाने सील करू असे ठाणे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले असल्याचे चंदनवाडी परिसरातील दुकानदारांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मनसेने बुधवारी हा मुद्दा उपस्थित केला असून खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची पालिकेकडून जाणारी जबरदस्ती म्हणजे ठाणेकरांची गळचेपी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोविड टेस्ट खाजगी लॅबमध्येच करण्याची जबरदस्ती त्यांच्यावर नाही असे मात्र पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपूर्वी उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या दुकानदारांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोविड टेस्ट करण्याचे पत्रके वाटली. यात एका खाजगी लॅबचा उल्लेख देखील केला आहे. कोविड टेस्ट केली नाही तर दुकाने सील केली जातील असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत या दुकानदारांनी मनसेचे कोपरी पाचपाखडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्याकडे धाव घेतली. यावेळी यांनी सरकारी रुग्णालयात या दुकानदारांची कोविड टेस्ट का हपू शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला. खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट साठी 2800 रुपये लागतील असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या दुकानदारांना सांगितले. ठाणेकरांसाठी एक लाख अँटीजन टेस्ट आल्या असताना खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट करण्याचा पालिकेचा अट्टाहास का? पालिकेचा यामागे मोठा भ्रष्टाचार आहे आणि मनसे तो समोर आणेल असा इशाराही कदम यांनी दिला. पालिकेचे कर्मचारी पत्रक घेऊन आले त्यावेळी त्यांनी आम्हाला खाजगी लॅबचा संदर्भ देत त्याठिकाणी 2800 रुपये देऊन कोविड टेस्ट करण्याचे सांगितले. आम्ही इतकी महागडी टेस्ट करणार नाही असे म्हटल्यावर कोविड टेस्ट न केल्यास तुमची दुकाने सील करू असे ते कर्मचारी म्हणाले अशी माहिती दुकानदार नजीब शेख यांनी दिली. महापालिकेने टेस्ट करण्याचे आवाहन केले तर ती चाचणी मोफत करावी अशी मागणी या दुकानदारांनी केली.
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठाण्यातील सर्व दुकानदारांना कोविड टेस्ट करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. ते ज्या प्रभाग समिती अंतर्गत येतात त्याच ठिकाणच्या जवळच्या लॅबचा त्यांना संदर्भ दिला जातो. पण त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही ते कुठेही टेस्ट करू शकतात आणि दुकाने सील केले जाईल असे पालिकेने सांगितलेले नाही असे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.