स्मशानभुमीच्या विरोधात आता मनसे आणि राष्ट्रवादीही उतरली मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:41 PM2018-04-10T15:41:36+5:302018-04-10T15:41:36+5:30
एकीकडे स्मशानभुमीच्या मुद्यावरुन सध्या ठाण्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असतांनाच आता या स्मशानभुमीच्या विरोधात मनसे आणि राष्ट्रवादी देखील उतरली आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे - मागाली काही दिवसापासून स्मशानभुमीच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. स्मशानभुमीच्या मागणीसाठी आमदार सरनाईक यांनी मोर्चा काढून अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शन केले असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. परंतु आपल्याच पक्षातील नेत्याचा विरोध सुरु असतांना आता मनसे आणि राष्ट्रवादीने देखील या स्मशानभुमीला आपला जाहीर विरोध दर्शविला आहे. रेप्टॉकॉसच्या स्मशानभुमीमुळे वर्तक, शास्त्रीनगरच्या रहिवाशांना त्रासच होणार असल्याची भुमिका मनसेने घेतली असून या स्थानिकांचा आमदारांनी विचार घ्यावा अशी मागणी देखील केली आहे.
मागील काही महिन्यांपासून ठाण्यात स्मशानभुमीच्या मुद्यावर चांगलेच वादळ उठले आहे. परंतु आता हे वादळ एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये रंगत असल्याचे दिसून येत होते. त्यानुसार आपल्या पक्षातील एका नेत्याला शह देण्यासाठी आमदार सरनाईक यांनी स्मशानभुमी व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. परंतु आता त्यांच्या या भुमिकेच्या विरोधात त्यांच्या पक्षातील नेत्यासह विरोधकांनी देखील यात आता उडी घेतली आहे. पोखरण रोड नं.१ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर व टिकुजीनी वाडी येथील मुल्लाबाग येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली असली तरी रेप्टाकॉस कंपनीचा भुखंड हा अॅमीनीटी प्लॉट असल्याने त्याठिकाणी स्मशानभुमी उभारताच येऊ शकत नसल्याचे मत आता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या स्मशानभुमीच्या विरोधात यापूर्वी देखील शिवसेनेच्या काही मंडळींनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. या स्मशानभूमीच्या आसपास बांधकाम चालु असलेल्या काही बिल्डरांचे लागेबांधे महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबरोबर असल्याने या परिसरातील काही मुठभर रहिवांशाना हाताशी धरून काही नगरसेवक या स्मशानभूमीला विरोध करू लागले असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
दरम्यान आता स्मशानभुमीच्या वादाला आणखी ठिणगी पडली आहे. स्मशानभुमीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात वर्तक नगर, शास्त्री नगर या भागातील रहिवासी नव्हते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी देखील नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच स्थानिकांचा या स्मशानभुमीला विरोध असतांना त्यांचे मत लक्षातच घेतले जात नसल्याचेही मनसे सांगितले आहे. त्यामुळे आता वेळ पडल्यास स्थानिक रहिवाशासह रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील मुल्लाबाग येथील संभावीत स्मशानभुमीला विरोध दर्शविला आहे. वस्तीत ही स्मशानभुमी होणे शक्यच नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच रेप्टाकॉस येथे स्मशानभुमीची गरज नसल्याचे मतही व्यक्त केले आहे.
स्थानिकांना मुळात विश्वासात घेण्यात आले नसून ज्या ठिकाणी स्मशानभुमी होणे शक्य नाही, त्याठिकाणी हट्ट करायचा कशाला. त्यामुळे वेळ पडल्यास स्मशानभुमीच्या विरोधात रस्त्यावर उतरु
(संदीप पाचंगे - मनविसेनेचे ठाणे शहर अध्यक्ष)
भर वस्तीत स्मशानभुमी कशी काय होऊ शकते. त्यामुळे या स्मशानभुमीला आमचा विरोध हा राहणारच आहे. पक्षांतर्गत सुरु असलेला स्मशानभुमीचा खेळ थांबू द्या मग आम्ही आमची भुमिका स्पष्ट करुच.
(मिलिंद पाटील - विरोधी पक्षनेते -ठामपा)