स्मशानभूमीविरोधात मनसे, राष्ट्रवादीही आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:01 AM2018-04-11T03:01:33+5:302018-04-11T03:01:33+5:30
घोडबंदर भागातील मानपाडा, टिकुजिनीवाडी भागातील स्मशानभूमीवरून शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर आलेला असतांना आता मनसे आणि राष्ट्रवादीनेदेखील तिला मंगळवारी विरोध दर्शविला.
ठाणे : घोडबंदर भागातील मानपाडा, टिकुजिनीवाडी भागातील स्मशानभूमीवरून शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर आलेला असताना आता मनसे आणि राष्ट्रवादीनेदेखील तिला मंगळवारी विरोध दर्शविला आहे. रेप्टॉकॉसच्या स्मशानभूमीमुळे वर्तकनगर, शास्त्रीनगरच्या रहिवाशांना त्रासच होणार असल्याची भूमिका मनसेनेही घेतली असून या स्थानिकांचा आमदारांनी विचार करावा, अशी मागणी केली आहे. याविषयावर आमदार प्रताप सरनाईकांना आता स्वपक्षीयांनीच नव्हे तर मनसे आणि राष्ट्रवादीनेही घेरल्याने या स्मशानभूमीबाबत आता शिवसेनाश्रेष्ठींसह प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
या स्मशानभूमीसाठी सोमवारी सरनाईक यांच्या मोर्चात वर्तकनगर, शास्त्रीनगर येथील रहिवाशांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. स्थानिकांचा तिला विरोध असतांनाही त्यांचे मत लक्षातच घेतले जात नसल्याने वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मनसेने मंगळवारी दिला. दुसरीकडे राष्टÑवादीनेदेखील मुल्लाबाग येथील संभावीत स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे. वस्तीत ती होणे शक्यच नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच रेप्टाकॉस येथे स्मशानभूमीचीही गरज नसल्याचे मतही व्यक्त केले आहे.
पोखरण रोड नं.१ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर व मुल्लाबाग येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली असली तरी रेप्टाकॉस कंपनीचा भूखंड हा अॅमिनीटी प्लॉट असल्याने त्याठिकाणी ती उभारता येऊ शकत नसल्याचे मत आता व्यक्त करण्यात येत आहे.
>भरवस्तीत स्मशानभूमी नको
मूळात स्थानिकांना विश्वासात घेण्यात आले नसून ज्या ठिकाणी स्मशानभूमी होणे शक्य नाही, त्याठिकाणी हट्ट करायचा कशाला. त्यामुळे वेळ पडल्यास या विरोधात रस्त्यावर उतरू.
- संदीप पाचंगे, मनविसेनेचे ठाणे शहर अध्यक्ष
भर वस्तीत स्मशानभूमी कशी काय होऊ शकते. त्यामुळे तिला आमचा विरोध हा राहणारच आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा शिवसेना पक्षांतर्गत सुरूअसलेला स्मशानभूमीचा खेळ थांबू द्या, मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. - मिलिंद पाटील,
विरोधी पक्षनेते -ठामपा