सुब्रमण्यम स्वामींना मनसेने विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:45 AM2017-10-30T01:45:16+5:302017-10-30T01:45:41+5:30
राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याची वादग्रस्त टीका करणारे सुब्रमण्यम स्वामी यांना शनिवारी व्याख्यानानंतर मनसेने जाब विचारला.
डोंबिवली : राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याची वादग्रस्त टीका करणारे सुब्रमण्यम स्वामी यांना शनिवारी व्याख्यानानंतर मनसेने जाब विचारला. राज ठाकरे परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचे स्वामी यांनी सांगताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालाचा दाखला देत मनसेने उत्तर भारतातील स्थलांतराचा मुद्दा मांडला. प्रत्येक मुद्द्यावर बोलणाºया स्वामी यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर का मौन बाळगले, अशी विचारणाही करण्यात आली.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी स्वामी यांना कार्यक्रमाच्या ठिकाणीच गाठले. ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न विचारला. स्वामी यांच्यासोबत असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कदम यांची समजूत काढून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि संयमाने घ्या, अशी समजूत काढली. एक पाऊल रामराज्याच्या दिशेने या विषयावर व्याख्यानासाठी स्वामी शनिवारी रात्री डोंबिवलीत आले होते. केवळ भाषणात टीका करून स्वामी थांबले नाहीत, तर पत्रकार परिषदेतही त्यांनी वक्तव्य सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान दिले. ठाकरे यांना डीएनएची कल्पना असल्यानेच ते आती यूपीवाल्यांविरोधात काही बोलत नसल्याचा दावा स्वामी यांनी केला. मराठी माणसाने परप्रांतात घुसखोरी केली. रोजगार ओरबडला आणि कायदे तोडले तर चालेल का, असा सवाल कदम यांनी केला. काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन स्वामी यांनी राज्या-राज्यात भांडणे लावण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप कदम यांनी केला.