सेनेला विरोधासाठी मनसे-भाजपा युती?
By admin | Published: October 21, 2016 04:26 AM2016-10-21T04:26:43+5:302016-10-21T04:26:43+5:30
शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढत मनसेने जोरदार मोहीम उघडायची आणि त्या लाटेवर भाजपाने स्वार व्हायचे, ही कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत
- मुरलीधर भवार, कल्याण
शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढत मनसेने जोरदार मोहीम उघडायची आणि त्या लाटेवर भाजपाने स्वार व्हायचे, ही कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत राबवलेली रणनीतीच ठाणे आणि उल्हासनगर पालिकांत पुन्हा पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीच्या राजकारणात मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. शिवसेनेसोबत गेल्यास मनसेच्या राजकारणाचा पायाच ढासळतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीत थेट भाजपासोबत जायचे किंवा त्यांच्यासोबतीने राजकारण करायचे, यावर पक्षात खलबते सुरू आहेत. मात्र त्याबाबत बोलण्यास नेते तयार नाहीत. आधीच्या लोकसभा, विधानसभा, केडीएमसीत मनसेचा आलेख घसरता आहे. मुंबईत मनसेने भाजपालाही टार्गेट केले असले, तरी शिवसेनेच्या कारभाराविरोधात त्यांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे मनसेचे येथील टार्गेटही शिवसेनाच असेल.
उल्हासनगरला मागील निवडणुकीत मनसेचा एक नगरसेवक निवडून आला होता, तोही भाजपामध्ये गेला. सध्या पाटी कोरी आहे. ठाण्यात सात नगरसेवक असले, तरी फाटाफुटीचे ग्रहण आहे. एकूणच मनसेची परिस्थिती बरी नाही. त्यामुळे संख्याबळ वाढवण्यासाठी युती करणे किंवा कोणत्या तरी पक्षासोबत जाणे, हेच पर्याय पक्षापुढे आहेत.
भाजपावर दबावाचे प्रयत्न
उल्हासनगरच्या राजकारणात पाय रोवायचे असतील, तर कोणासोबत तरी जाण्याची मनसेची तयारी आहे, हे दाखवून देण्यासाठी आणि भाजपावर दबावासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी ओमी कलानी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
कलानींच्या प्रवेशावरून भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत हाणामारीची वेळ आली आहे. भाजपा, ओमी टीम आणि मनसे असे एकत्र येत निवडणुकीला सामोरे जायचे किंवा ओमी जर भाजपात गेले, तर भाजपा-मनसे असे एकत्र येत निवडणूक लढवायची, असा विचार पक्षात सुरू आहे.
भाजपा-ओमी यांनी सिंधीभाषक अमराठी मतांवर लक्ष द्यायचे आणि मनसेने शिवसेनेच्या मराठी मतांना धक्का द्यायचा, अशी ही व्यूहरचना असल्याचे समजते.