मनसे-भाजपा राड्याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:22 AM2019-05-11T06:22:35+5:302019-05-11T06:22:48+5:30
आंबा विक्रीच्या एका अनधिकृत स्टॉलवर ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरून मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री राडा झाला होता.
ठाणे : आंबा विक्रीच्या एका अनधिकृत स्टॉलवर ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरून मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री राडा झाला होता. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगविले होते. यानंतर शुक्रवारी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि भाजपचे शहर अध्यक्ष अॅड. संदीप लेले यांच्यासह २० जणांविरुद्ध मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
विष्णुनगर भागात लावलेल्या या अनधिकृत स्टॉलची तक्रार भाजपच्या नगरसेविकेने केली होती. तिची गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिकेने तत्परतेने या स्टॉलवर कारवाई केली. याचाच राग आल्याने मनसेचे अविनाश जाधव आणि नगरसेवक सुनेश जोशी तसेच मृणाल पेंडसे यांच्यात चांगलाच वाद झाला. याच प्रकरणी भाजप आणि मनसेच्या २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी काही जणांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच चित्रीकरणाच्या आधारे उर्वरित कार्यकर्त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.