निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं काय?, न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा; राज ठाकरेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:34 PM2023-05-12T12:34:18+5:302023-05-12T12:35:06+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंर्घषाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ठोस माहितीचा आधार न घेता राजकीय आखाड्यात उतरले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदी भरत गोगोवले यांची बेकायदेशीर नियुक्ती केली, असे कठोर ताशेरे सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी नोंदविले. या संघर्षात बहुमत चाचणीला सामोरे न गेल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठी चूक केल्याची अधोरेखित करत या कृतीमुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदावर पुन्हा स्थापित होण्याची संधी गमावल्याचेही घटनापीठाने नमूद करताना घटनापीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारला जीवदान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळे दावे करत आहे. निर्णय आमच्याच बाजूने लागलाय, असा दावा दोन्ही बाजूने करण्यात येत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात अनेक कायदे, अटी, मुद्दे असल्याचे थोडं निकाल समजण्यात संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंर्घषाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा आहे. जेव्हा मला न्यायालयाकडून किंवा पोलिसांकडून नोटीस येते. तेव्हा ती भाषा वाचताना समजत नाही, नक्की अटक केलीय की सोडलंय. आणि कालचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालात सांगितले की, सर्व प्रकिया चुकली. मात्र माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. तसेच निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव त्या गटाकडे दिलंय, मग त्याचं काय होणार?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
या गोष्टी खूप संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, सर्व धुळ एकदा खाली बसली की त्यावेळी आपल्याला समजेल नक्की काय झालंय, असं राज ठाकरेंनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारताच, मला त्यांच्याबाबत काहीही विचारू नका. त्यांचे प्रश्न त्यांना विचारा. त्यांचा वेगळा पक्ष आहे, माझा वेगळा पक्ष आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरे सध्या मिरा-भाईंदरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी- उद्धव ठाकरे
देशाच्या आणि, महाराष्ट्राच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशात चुकीचा कारभार होत आहे. हे देशाला शोभत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बदनामी करणाऱ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर घालावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना केली.