"भोंग्यांबाबत बोलता मग तुम्ही काल घेतलेल्या सभेबाबतही माफी मागा, कारण...", आव्हाडांनी ठेवलं नियमांवर बोट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 12:39 PM2022-04-13T12:39:26+5:302022-04-13T12:39:55+5:30
राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांमुळे त्रास होतो असं म्हणतात मग त्यांनी काल ज्या ठिकाणी सभा घेतली तिथं बाजूला दोन शाळा आहेत. मग तुमच्या कार्यकर्त्यांना नियम माहित नव्हता का?
ठाणे-
राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांमुळे त्रास होतो असं म्हणतात मग त्यांनी काल ज्या ठिकाणी सभा घेतली तिथं बाजूला दोन शाळा आहेत. मग तुमच्या कार्यकर्त्यांना नियम माहित नव्हता का?, असा सवाल राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी काल ठाण्यातील जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. त्यास आव्हाडांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.
"राज ठाकरे भोंग्यांबाबत बोलले. पण आपण जे बोलतो त्याचा जरा अभ्यास त्यांनीही करायला हवा. नियमांवर बोट ठेवायचं झालं तर काल ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली तिथं बाजूलाच दोन शाळा आहेत. कोर्टाच्या निर्णयानुसार शाळेच्या १०० मीटर परिसरात मोठ्या आवाजात कोणतेही कार्यक्रम किंवा सभा घेता येत नाही. तरीही तुम्ही त्याच जागी सभा घेतली. मग हा नियम तुमच्या कार्यकर्त्यांना माहित नव्हता का? राज ठाकरे कालच्या सभेसाठी माफी मागणार का?", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महागाईच्या मुद्द्यावर राज ठाकरे गप्प का?
"राज ठाकरेंना काल मुळातच सभा का घ्यावी लागली. याचा त्यांनी स्वत: विचार करावा. त्यांच्या पक्षातच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवर तुम्ही बोलता. एखाद्यानं दंगल घडविण्याची सुपारीच घेतली असेल तर त्याला आपण तरी काय करणार? राज ठाकरे महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर का बोलत नाहीत? त्यांना देशातील महागाई दिसत नाही. त्याबद्दल त्यांनी एक चकार शब्द देखील काढला नाही", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राजकीय व्यासपीठावर एक नवा 'जॉनी लिव्हर' सापडलाय
"आपण ज्यांच्या पुण्याईवर जीवंत आहोत. त्यांचा मान राखा. प्रबोधनकारांच्या पुण्याईमुळे लोक तुम्हाला ऐकायला येतात. हे असे खेळ करुन जे आहे ते सुद्धा गमावू नका. मला गरागरा फिरवून टाकू म्हणालात एकदा तुमच्या भाषणाचा व्हिडिओ तुम्हीच पाहा. त्यावर कौतुकापेक्षा स्माइली जास्त आलेत. समाजाला राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय असं लोक म्हणू लागलेत", असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.