राज ठाकरेंनी भरला टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना दम; मुंबईकडे जाणारी वाहतूक टोलकर्मचाऱ्यांनी सोडली
By अजित मांडके | Published: February 2, 2024 08:40 PM2024-02-02T20:40:22+5:302024-02-02T20:51:01+5:30
मुंबईकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणारी वाहतूक त्वरित टोलकर्मचाऱ्यांनी सोडली.
ठाणे :मनसेप्रमुखराज ठाकरे हे शुक्रवारी नाशिक दौरा आटपून परतताना काही वेळ ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना त्यांच्या वाहनांचा ताफा हा मुलुंड चेकनाका येथील वाहतूक कोंडीत सापडला. येथील दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी स्वतः मनसेप्रमुखराज ठाकरे हे त्यांच्या गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल खडे बोल ही सुनावले. त्यानंतर मुंबईकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणारी वाहतूक त्वरित टोलकर्मचाऱ्यांनी सोडली. नंतर त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
मनसेप्रमुख हे मागील दोन दिवस नाशिकच्या दोऱ्यावर होते. हा दोरा आटपून शुक्रवारी ते मुंबईला परतत होते. यावेळी सायंकाळी सातच्या सुमारास ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते. येथे त्यांनी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून ते साडे सातच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा हा मुलुंड येथील टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकला होता. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाही टोलनाक्यावरील कर्मचारी टोल ची वसुली करत होते. याने संतप्त झालेले मनसेप्रमुख राज ठाकरे हे स्वतःच्या वाहनातून उतरले आणि टोलनाक्यावर गेले.
येथे त्यांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना होत असलेल्या टोल वसुली बाबत तेथील कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना सुरु असलेल्या टोल वसुली बाबत राज ठाकरे यांनी नाराजगी देखील व्यक्त केली. राज यांच्या या भूमिकेनंतर त्वरित या टोलकर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूची वाहने त्वरित सोडण्यास सुरवात केली. त्यानंतर काही मिनिटांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा ताफा ही मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
राज ठाकरेंनी भरला टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना दम#rajthackeraypic.twitter.com/G4O4nMBZmb
— Lokmat (@lokmat) February 2, 2024