अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे करणार जाहीर; शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 10:35 AM2022-04-01T10:35:44+5:302022-04-01T10:46:20+5:30
- संदीप प्रधान ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित ...
- संदीप प्रधान
ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अयोध्येला आपण का जायचे, ही भूमिकाही राज ठाकरे जाहीर करणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या वापराबाबतही ते भाष्य करणार आहेत.
राज ठाकरे हे अयोध्येला जाणार, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र कोरोना निर्बंधामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलला गेला. आता कोरोनाचे निर्बंध सैलावले असल्याने राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्याची तारीख शनिवारी जाहीर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावरून जाहीर प्रखर भूमिका घेण्यात अडचण आहे. काँग्रेसच्या अस्वस्थ आमदारांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली असल्याने हीच संधी साधत मनसे हिंदुत्वाची जहाल भूमिका घेण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
आपण हिंदुत्वाची भूमिका का घेत आहोत, याची मीमांसा राज ठाकरे मेळाव्यात करणार आहेत. मागील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज यांनी ‘लाव रे तो व्डिडीओ’ अशी आरोळी ठोकत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते. आता येत्या महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडतील.
महापालिकेतील भ्रष्टाचार व नागरी समस्या यावरून राज ठाकरे हे सरकारला लक्ष्य करतील. त्याच वेळी ईडीच्या कारवायांवरही भाष्य करणार आहेत. यापूर्वी कोहिनूर मिलच्या खरेदीबाबत राज ठाकरे यांनाही ईडीने नोटीस पाठवून चौकशीला बोलावले होते. त्यामुळे राज ठाकरे हे ईडी व केंद्र सरकारवर तोंडसुख घेणार की, ईडीच्या सेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवायांचे समर्थन करणार याबाबत उत्सुकता आहे.
शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवणार
महापालिका निवडणुकीत लढत मुख्यत्वे शिवसेना विरुद्ध भाजप अशी आहे. मात्र मनसेला आपली स्पेस निर्माण करावी लागणार आहे. सत्तेमुळे कठोर भूमिका घेताना शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार आहेत.