Raj Thackeray: मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:32 AM2022-06-14T08:32:52+5:302022-06-14T08:44:29+5:30
राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत.
मुंबई/ठाणे- मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. मात्र तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही, असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातही बॅनर्स लावून राज ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. मुंब्रा येथील नुरानी हॉटेलसमोरील रस्त्यावर हे बॅनर लावण्यात आले होते. मात्र यातील काही बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले आहे. त्यामुळे आता परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
इरफान सय्यद यांच्याकडून मुंब्रा परिसरात बॅनर्स लावण्यात आले होते. राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या जाहीर सभेत मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला होता. नंतर मुंब्र्यातील वातावरण तापले आणि या परिसरातील मनसे पदधिकारी इरफान सय्यद यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा बॅनर्स फाडण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळी करता आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी (१४ जून) माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी दरवर्षी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळतं. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.