उल्हासनगर लालचक्की येथील जलकुंभ बंद, सुरू करण्याची मनसेची मागणी
By सदानंद नाईक | Published: February 21, 2023 05:24 PM2023-02-21T17:24:08+5:302023-02-21T17:25:30+5:30
जलकुंभ सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना नियमित व समप्रमाणात पाणी पुरवठा मिळणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.
उल्हासनगर - कॅम्प नं-४, लालचक्की येथील बंद अवस्थेतील जलकुंभ नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्याची मागणी मनसेने महापालिका आयुक्ताकडे केली. जलकुंभ सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना नियमित व समप्रमाणात पाणी पुरवठा मिळणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.
उल्हासनगरात पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली असून योजनेतून ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारण्यात आले. त्यापैकी प्रेमनगर टेकडी, लालचक्की, कॅम्प नं-१ येथील उंच जलकुंभ तांत्रिक कारणामुळे वापरण्यात आले नाही. लालचक्की येथील जलकुंभ सुरू करून स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख व उपजिल्हाप्रमुख प्रदीप गोडसे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. हे जलकुंभ सुरू झाल्यास आझादनगर, सीतारामनगर, सार्वजनिक परिसर, उत्कर्ष नगर, होली फॅमिली शाळा परिसर, साने गुरुजीनगर, रेल्वे स्टेशन रोड, अंबिकानगर आदी भागाला नियमित व पुरेशा पाणी पुरवठा होणार असल्याचे मनसे नेत्यांचे म्हणणे आहे.
कॅम्प नं-४ लालचक्की येथील जलकुंभ महापालिका पाणी पुरवठा विभागाने सुरू केले नाहीतर, येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना दिला. तसेच याबाबत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंग्रेकार व दिपक वानखेडे यांच्या सोबत चर्चा केली. त्यांनी जलकुंभ सुरू करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.