शिवजयंतीच्या दिवशी सीबीएसई बोर्डाची होणारी परीक्षा रद्द करावी; मनसेची मागणी

By अजित मांडके | Published: February 12, 2024 02:46 PM2024-02-12T14:46:54+5:302024-02-12T14:49:09+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई)  बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होत आहे.

MNS demands cancellation of CBSE board exam on Shiv Jayanti day | शिवजयंतीच्या दिवशी सीबीएसई बोर्डाची होणारी परीक्षा रद्द करावी; मनसेची मागणी

शिवजयंतीच्या दिवशी सीबीएसई बोर्डाची होणारी परीक्षा रद्द करावी; मनसेची मागणी

ठाणे : १९ फेब्रुवारी हा छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस संपूर्ण जगात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सीबीएसई बोर्डाने वेळापत्रकात संस्कृत विषयाचा पेपर नियोजित केला आहे अशी तक्रार काही पालकांनी मनसे कडे केली आहे. बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन करताना शासकीय सुट्ट्यांबाबत विचार केला जातो सीबीएसई बोर्ड मात्र जाणीवपूर्वक असे कृत्य करत त्यामुळे सीबीएसई बोर्डाने त्या दिवशी होणारा पेपर रद्द करावा अशी मागणी मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई)  बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होत आहे. तर ही परीक्षा २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. परंतु १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशीच सीबीएसई बोर्डाचा संस्कृत विषयाचा पेपर आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्र शासनाने अधिकृत सुट्टी जाहिर केलेली असताना सीबीएसई बोर्डाने राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधणे आवश्यक होते.  शिवजयंतीच्या दिवशी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या गौरवशाली, पराक्रमी इतिहासाची माहिती दिली गेली पाहिजे. सर्व शाळांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली पाहिजे. मात्र सीबीएसई बोर्ड महाराष्ट्राच्या दैवताचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान शिक्षण विभागाने १९ फेब्रुवारीचा संस्कृत विषयाचा पेपर रद्द न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या दिवशी परीक्षा होऊ देणार नाही. असा इशारा देण्यात आला असून तात्काळ सीबीएसई बोर्डाच्या व्यवस्थापकांना परीक्षा रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.
 

Web Title: MNS demands cancellation of CBSE board exam on Shiv Jayanti day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.