MNS Dahi Handi: दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 01:12 PM2021-08-30T13:12:30+5:302021-08-30T13:13:03+5:30
MNS Dahihandi: दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी स्टेज उभारणीचं काम सुरू असताना पोलिसांनी काम बंद पाडलं.
MNS Dahihandi: दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी स्टेज उभारणीचं काम सुरू असताना पोलिसांनी काम बंद पाडलं. त्यानंतर मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपोषणाला सुरुवात केली. कार्यक्रमाला परवानगी नसतानाही स्टेज उभारणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
राज्यात राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते मग हिंदू सण साजरे करायला बंदी का? असा सवाल उपस्थित करत अविनाश जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. तसंच दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. नौपाडा येथील भगवती मैदानावर मनसेनं दहीहंडी कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्यास सुरुवात केली होती. याठिकाणी पोलिसांनी काम थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी आंदोलन सुरू केलं. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जाधव यांना घटनास्थळी जावून समजवण्याचा प्रयत्न केला. पण मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे
दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यातhttps://t.co/JkFetXdotu#mnspic.twitter.com/ZCJl90mlZr
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2021
कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करुन दहीहंडी साजरी करण्याची तयारी मनसेकडून सुरू होती त्यामुळे काम थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोना संबंधिचे सर्व नियमांचं पालन करुन दहीहंडी साजरी करण्यावर ठाम असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
एकाला अटक केली पण उद्या हजारो महाराष्ट्र सैनिक जमतील त्याचं काय? - संदीप देशपांडेhttps://t.co/JkFetXdotu#mnspic.twitter.com/Hfos6OBZ4f
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2021