मनसेचा डिजिटलनामा प्रकाशित
By admin | Published: February 20, 2017 05:55 AM2017-02-20T05:55:59+5:302017-02-20T05:55:59+5:30
ठाणे मनसेने एक पाऊल पुढे टाकत आपला जाहीरनामा डिजिटल स्वरूपात ठाणेकरांसमोर आणला आहे. या जाहीरनाम्याचे प्रकाशन
ठाणे : ठाणे मनसेने एक पाऊल पुढे टाकत आपला जाहीरनामा डिजिटल स्वरूपात ठाणेकरांसमोर आणला आहे. या जाहीरनाम्याचे प्रकाशन रविवारच्या पत्रकार परिषदेत झाले. तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या डिजिटलनाम्यात केवळ आश्वासने नसून त्याचा कृती आराखडादेखील मांडण्यात आल्याचे मनसेचे उपाध्यक्ष अभिजित पानसे व शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.
हा डिजिटल वचननामा सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांतून प्रत्येक नागरिकांच्या हातात पडावा आणि तो अत्यंत गंभीरपणे नागरिकांनी समजून घ्यावा, यासाठी पारंपरिक जाहीरनामा प्रकाशित करण्याची पद्धत मोडून ठाणे मनसेने तो डिजिटल स्वरूपात मांडला आहे.
कचराकुंडीमुक्त नव्हे, डम्ंिपगमुक्त ठाणे शहर, शिक्षणसेतू उपक्रम, सौरशहराची निर्मिती, सायकल स्टॅण्ड, जनशक्ती कट्टे, लाभार्थी योजनेची महासूची, जनसमस्या कक्ष, तलावाचे शहर भागवणार शहराची तहान, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांना या डिजिटलनाम्यात स्थान देण्यात आले आहे. ठाण्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठी ई-लायब्ररी उभी करणार, प्रभागनिहाय शालेय शिक्षण
समितीवर त्यात्या प्रभागातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची नियुक्ती करणार, अप्रगत मुलांसाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेत शालेय वेळेनंतर विशेष शिकवणी वर्ग सुरू करणार, खाजगी वाहतुकीवर नियंत्रण आणणार आणि परिवहन सेवा सक्षम करणार, ठाण्यातील खाजगी शाळांना परिवहन सेवेच्या बसेस सलवतीच्या दरात उपलब्ध करून देणार, प्रत्येक प्रभागात दोन बचत गट बाजार सुरू करणार, वैद्यकीय संघटनांबरोबर
करार करून पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करणार, प्रत्येक प्रभागात अत्याधुनिक प्रसूतिगृह व नवजात बालक शुश्रूषा केंद्र उभारणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागात डे केअर सेंटर उभारणार, महासभेचे स्थानिक वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करणार, प्रत्येक १० किलोमीटरसाठी पार्किंगसाठी वाहनतळ उभारणार, पोलीस आयुक्तालय वाहतूक नियंत्रण कक्षाला साहाय्यभूत ठरेल, अशी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या धर्तीवर वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभारणार, विकास आराखड्याची अंमलबजावणी करणार, या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)