मनमानीमुळे घसरले मनसेचे इंजीन; ठाण्यात पक्षातील खदखद चव्हाट्यावर, बहिष्काराचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:21 AM2018-03-22T03:21:39+5:302018-03-22T03:21:39+5:30

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याला दणदणीत मेळावा घेत पक्षवाढीसाठी नेते-पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतानाच ठाण्यात मात्र वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या रुळावरुन मनसेचे इंजिन घसरल्याने नेते-कार्यकर्त्यांचे डबे परस्परांवर आदळू लागले आहेत.

 MNS engineered due to arbitrariness; The session of the boycott, at Khadkhad Chawat, Thane party | मनमानीमुळे घसरले मनसेचे इंजीन; ठाण्यात पक्षातील खदखद चव्हाट्यावर, बहिष्काराचे सत्र

मनमानीमुळे घसरले मनसेचे इंजीन; ठाण्यात पक्षातील खदखद चव्हाट्यावर, बहिष्काराचे सत्र

googlenewsNext

ठाणे : एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याला दणदणीत मेळावा घेत पक्षवाढीसाठी नेते-पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतानाच ठाण्यात मात्र वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या रुळावरुन मनसेचे इंजिन घसरल्याने नेते-कार्यकर्त्यांचे डबे परस्परांवर आदळू लागले आहेत. वरिष्ठ पदाधिकाºयांकडून डावलले जात असल्याचा आरोप जुने-जाणते, अनुभवी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे पक्षातील खदखद समोर आली आहे.
वरिष्ठ पदाधिकाºयांचा मनमानी कारभार, महत्त्वाचे आंदोलन-बैठकांना न बोलावणे आणि आमच्या सूचना राज ठाकरे यांच्यापर्यंत न पोहोचविता मध्येच त्या गुंडाळल्या जाणे, अशा अनेक प्रसंगांचे दाखले देत ठाण्यातील मनसेच्या कार्यकारिणीवर जुन्या मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व आरोप चुकीचे आहेत. जे नाराज आहेत त्यांची आम्ही समजूत काढू. परंतु त्यांनीही संघटनात्मक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट मत पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ‘लोकमत’कडे मांडले.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या दारूण पराभवानंतर उभारी घेत राज ठाकरे यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी गुढीपाडव्याला सभा घेतली. हे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र संघटना खिळखिळी झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सर्वांना बरोबर घेऊन पदाधिकारी चालत नाहीत. उलट मर्जीतले पदाधिकारी- कार्यकर्त्यांना घेऊन काम करत असल्याचा आरोप या नाराज गटाकडून केला जात आहे. आमची नाराजी पक्षाविरोधात नसून ठाण्यातील वरिष्ठ पदाधिकाºयांच्या विरोधात असल्याची भूमिका त्यांनी घेतली. पक्षात गेली १२ वर्षांपासून मनसैनिक काम करीत आहेत. परंतु वरिष्ठ पदाधिकारी जुन्या मनसैनिकांना पूर्णपणे डावलत आहेत. आमच्या सूचना कधीही राज ठाकरेंपर्यंत पोहोचविल्या जात नाहीत. शहरातील नियुक्त्या करताना कोणाला विश्वासात घेतले जात नाही. जुन्या मनसैनिकांचा वापर फक्त आंदोलनातील गर्दी दाखविण्यासाठी होतो. महत्त्वाचे आंदोलन असो की, बैठका यातून जुने पदाधिकारी- कार्यकर्त्यांना वगळले जाते. मूळात त्याची कल्पनाही दिली जात नाही. पक्षात सध्या आयाराम गयारामांना प्राधान्य दिले जाते. आम्हाला फक्त नाममात्र पदाधिकारी म्हणून ठेवण्यात आले आहे. पदाप्रमाणे काम करण्याचे अधिकारही दिले जात नाहीत. कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात एकापेक्षा अधिक महत्त्वाची पदे गरज नसताना देण्यात आली आहेत, अशा एक ना अनेक आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वांद्रे येथे गेल्या आठवड्यात राज यांनी घेतलेल्या बैठकीत पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून सूचना मागविण्यात आल्या. या बैठकीबाबत ठाण्यातील वरिष्ठ पदाधिकाºयांनी आम्हाला कळविलेही नाही. तो राग होता म्हणूनच १५ मार्चला जय भगवान हॉल येथे झालेल्या मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीवर या नाराजांनी बहिष्कार टाकल्याचेही या पदाधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ठाण्यातील मनसेत सध्या ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे काम सुरू आहे. शहरात संघटना बांधणी होत नाही आणि ती पदाधिकाºयांनाच नको असल्याचा गंभीर आरोप ठाणे शहर सचिव पदाच्या दर्जाच्या नाराज मनसैनिकांनी केला आहे.

थेट राज ठाकरेंना कनेक्ट व्हा! : पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सूचना देण्यासाठी ‘कनेक्ट राज ठाकरे’ हे नेटवर्क उपलब्ध आहे. त्यामुळे जे नाराज आहेत ते त्यांच्या सूचना या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात. या नाराज कार्यकर्त्यांना आम्ही कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेत नाही असे वाटत असेल; तर यापुढे त्यांना नक्की सहभागी करुन घेतले जाईल. परंतु या नाराज पदाधिकाºयांकडून माझी माफक अपेक्षा आहे, की त्यांनी संघटनेचे कार्यक्रम, आंदोलन असेल तर त्यात सहभागी व्हावे. संघटना वाढविण्यासाठी तुम्ही काम करणार नसाल, तर ते संघटनेसाठी निश्चितच हिताचे नाही. नाराज पदाधिकाºयांची आम्ही समजूत काढू. राज ठाकरे यांचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहे, त्यांना ते सन्मानाने भेटू शकतात. - अविनाश जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष

Web Title:  MNS engineered due to arbitrariness; The session of the boycott, at Khadkhad Chawat, Thane party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.