मनसेने उडवले फुर्रर्रर्रर्रर्रर्र.... फुगे, डोंबिवलीत साजरा केला 'फेकू दिन'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 03:00 PM2018-04-02T15:00:10+5:302018-04-02T15:00:10+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी एप्रिल फूलच्या अनुषंगाने ‘फेकू दिन’ साजरा करत भाजपावर तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र......बुडबुडे सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
डोंबिवली : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी एप्रिल फूलच्या अनुषंगाने ‘फेकू दिन’ साजरा करत भाजपावर तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र......बुडबुडे सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केलेल्या फेकू दिनामध्ये मोदी आणि फडणवीस यांच्या वतीने देण्यात आलेल्या खोट्या आश्वासनांचा यावेळी निषेध करण्यात आला.
१ एप्रिल हा दिवस एप्रिल फुल म्हणून मानला जातो. डोंबिवली मनसे शहर शाखेच्या वतीने सलग दोन वर्षे हा दिवस ‘फेकू दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. मला देशाचा पंतप्रधान नको तर चौकीदार बनवा. जो काळा पैसा देशाच्या बाहेर आहे, तो देशामध्ये आणायचा आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले वायदे कसे खोटे ठरले, हे या वेळी सांगण्यात आले.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावेळी टार्गेट करण्यात आले. सत्तेत येताना त्यांनी दिलेली अनेक आश्वासने फोल ठरली आहेतच. कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी साडेपाच हजार कोटी निधी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी दिले होते, पण ते पूर्ण झालेले नाही. दरम्यान, महाराष्ट्राच्या खेडोपाडी ६५ हजार विहिरी बांधल्या गेल्या. आमची सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू, ही आश्वासने देखील पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची मनसेच्या वतीने रविवारच्या फेकू दिनाच्या वेळी खिल्ली उडवण्यात आली.