मते मिळविण्यासाठी मनसेला करावी लागणार प्रयत्नांची पराकाष्ठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 07:42 PM2019-09-21T19:42:12+5:302019-09-21T19:43:50+5:30
चार मतदारसंघांत अनेक जण इच्छुक : युतीची डोकेदुखी वाढणार
- अजित मांडके
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु, लाव रे तो व्हिडीओमुळे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती. त्यानंतर, आता उशिराने का होईना, पक्षाने राज्यात विधानसभेच्या १०० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यामध्ये ठाण्यातील चारही जागा लढविण्याचा पक्षाचा विचार असून त्यासाठी काही मोजक्याच इच्छुकांची नावे समोर आली आहेत. ती श्रेष्ठींकडे पाठविली आहेत. असे असले तरी काहींनी आतापासूनच सोशल मीडियावर प्रचारसुद्धा सुरू केल्याचे दिसत आहे. परंतु, पक्षाला चारही मतदारसंघांमध्ये मते मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
ठाण्यात मनसेचा एकही नगरसेवक नसला तरी त्यांची पारंपरिक अशी सुमारे एक लाखांच्या आसपास मते आहेत. ती मते आता मिळविण्यासाठी मनसेचा प्रयत्न असणार आहे. लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतली होती. मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास मनसेच्या अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती. त्यामुळे ही मते आता निर्णायक ठरणार आहेत. त्यानंतर, झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे शहर विधानसभेतून निलेश चव्हाण यांना आठ हजार ३८१ मते मिळाली होती. परंतु, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून सेजल कदम यांना आठ हजार ५७८ मते मिळाली होती. तर, ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सुधाकर चव्हाण यांना २० हजार ५६८ मते मिळाली होती. ठाण्यात मनसेचा तसा बऱ्यापैकी बोलबाला आहे.
दरम्यान, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची चांगलीच घसरण झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तर मनसेला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानुसार, पक्षाची आताच्या घडीला या मतदारसंघात अंदाजे एक लाखांच्या आसपास मते असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मतांमध्ये वाढ करण्याबरोबरच शिवसेना आणि भाजपला त्यांना कांटें की टक्कर देण्यासाठी तगडे उमेदवार पक्षाला द्यावे लागणार आहेत. दुसरीकडे आता मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची लगबग सुरूझाली आणि इच्छुकांची भाऊगर्दीही या पक्षात काही प्रमाणात का होईना दिसत आहे.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत ठाण्यातील चारही मतदारसंघांतून काही प्रमुख नावे श्रेष्ठींकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह महेश कदम यांची नावे पुढे आली आहेत. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि राजश्री नाईक, तर ओवळा-माजिवडा मतदारसंघातून संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आणि प्रसाद सुर्वे आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातून सुशांत सूर्यराव, महेश साळवी यांची नावे श्रेष्ठींकडे गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता कोणाच्या पारड्यात पक्ष उमेदवारी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाण्यात आंदोलनाच्या माध्यमातूनच मनसेचा चेहरा दिसला आहे. मात्र, महापालिकेत त्यांचे प्रतिनिधित्व दिसून आले नाही. त्यामुळे मतांची बेगमी मिळविण्यासाठी मनसेला राज ठाकरे यांचा करिष्मा किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.