उल्हासनगर महापालिका चाचणी निदान केंद्राचे मनसेकडून उद्धाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 06:28 PM2020-12-01T18:28:24+5:302020-12-01T18:29:22+5:30
Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेकडून कोरोना रुग्णाच्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करून, स्वतंत्रपणे आरटीपीसीआर लॅब म्हणजेच चाचणी निदान केंद्र उभारण्यात आले.
उल्हासनगर : लाखो रुपये खर्च करून उभारलेले आणि उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चाचणी निदान केंद्राचे उदघाटन मनसेकडून आज करण्यात आले. मनसेने चाचणी निदान केंद्र यापूर्वी सुरू करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती.
उल्हासनगर महापालिकेकडून कोरोना रुग्णाच्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करून, स्वतंत्रपणे आरटीपीसीआर लॅब म्हणजेच चाचणी निदान केंद्र उभारण्यात आले. केंद्राचे काम पूर्ण होऊनही केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने सर्वस्तरातून टीका होत होती. महापालिकेकडे चाचणी निदान केंद्र उपलब्ध असताना, आरोग्य विभाग नागरीक, व्यापाऱ्यांची अँटिजन चाचण्या करून घेण्यासाठी आग्रह धरीत असल्याचा आरोप मनसेने करून चाचणी निदान केंद्र सुरू करण्याची मागणी केली.
केंद्रात थर्मा फिशर कंपनीच्या व अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक मशिन्स या निदान केंद्रामध्ये पडून असल्याचेही, मनसेचे म्हणणे आहे. दररोज १००० लोकांची चाचणी होईल. अशा दर्जाचे चाचणी केंद्र महापालिकेकडे असताना, कोरोना चाचणीसाठी मुंबईतील प्रयोग शाळांवर अवलंबून राहावे लागत आहे. असा आरोप मनसेचे सचिन कदम यांनी केला.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाही चाचणी निदान केंद्र सुरू केले नाही. या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज या चाचणी निदान केंद्राचे एका जेष्ठ नागरिकाच्या हाताने प्रतिकात्मक उदघाटन केले. महापालिका प्रशासनाला या उदघाटनाने जाग आली असेलतर, आजपासून चाचणी निदान केंद्र वापरासाठी सुरू करावे. अशी प्रतिक्रिया सचिन कदम यांनी दिली. यावेळी उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर संघटक मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, विभाग अध्यक्ष बादशहा शेख, कैलास वाघ,उप-विभाग अध्यक्ष विक्रम दुधसाखरे,विध्यार्थी सेनेचे सचिव सचिन चौधरी, प्रवीण माळवे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चाचणी केंद्राच्या उदघाटनबाबत कल्पना नाही - करुणा जुईकर
महापालिकेने उभारलेल्या कोरोना चाचणी निदान केंद्राचे उद्धाटन मनसेच्यावतीने आज झाले. याबाबत कल्पना नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी दिली. तसेच, याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल, असे त्या म्हणाल्या. तर महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांच्यासोबत संपर्क झाला नाही.