स्वतंत्र नगरपालिकेसाठी मनसेही आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:19 AM2018-07-28T00:19:09+5:302018-07-28T00:19:36+5:30
२७ गावांचा मुद्दा :...तर आमचे नगरसेवकही राजीनामा देतील, राजू पाटील यांचे पत्र
डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चाने गुरुवारी आक्रमक पवित्रा घेत स्वतंत्र नगरपालिकेच्या कार्यवाहीत खोडा घालणाऱ्यांना आंदोलनाद्वारे समज दिली. दरम्यान, या आंदोलनाला मनसेचे नेते राजू पाटील यांनी पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला.
गावांच्या भल्यासाठी संघर्ष समितीच्या पाठिंब्यावर व भाजपा तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवल्यास मनसेचे दोन्ही नगरसेवक त्यांच्या पदाचा राजीनामा देतील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली आहे.
बेताल वक्तव्य करून खोडा घालण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा घरावर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा गुरुवारी युवा मोर्चाने दिला. दरम्यान, मनसे नेहमीच संघर्ष समिती व युवा मोर्चा यांच्यासोबत आहे, असे पत्र पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना पाठवले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ आॅगस्टची सकाळ २७ गावांतील नागरिकांची इच्छापूर्ती करणारी असेल, असे भाकीत केले होते. सरकारद्वारे आश्वासने नेहमीच दिली जातात. परंतु, दुर्दैवाने अंमलबजावणी मात्र केली जात नाही. मुख्यमंत्र्यांनी हे तशाच प्रकारचे आश्वासन तर दिले नाही ना, याबद्दल पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.
१५ आॅगस्टपूर्वी अंमलबजावणी व्हावी
मुख्यमंत्र्यांनी २७ गावांना स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा देऊन आम्हाला ती १५ आॅगस्टपर्यंत मिळवून द्यावी. पालिकेला कोणी विरोध करत असेल, तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, याचाही विचार झाला पाहिजे, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.