ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने घातले श्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 04:19 PM2018-10-08T16:19:11+5:302018-10-08T16:37:19+5:30
ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने श्राद्ध घालून निषेध केला.
ठाणे : वर्तकनगर रुणवाल प्लाझा येथील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाºयांचे व त्यांना पाठीशी घालणाºया लोकप्रतिनिधींचे मनसे ओवळा माजीवडा विधानसभेच्यावतीने या प्रकल्पाच्या जागेवर सोमवारी सवर्पित्री अमावस्येनिमित्त श्राद्ध घातले. तसेच, मनसेच्या एका कार्यकर्त्याने मुंडन करुन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला.
ठाणे महापालिकेने २५ आॅगस्ट २०१४ रोजी बॉलीवूड थीम पार्क या प्रकल्पाचे भूमिपुजन केले. त्यानंतर या कामास सुरूवात झाली पण ते अर्ध्यावर थांबले. अजतागायत हे काम पुर्णत्वास आले नाही. याकडे पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. यावेळी मनसैनिकांनी काव काव ऐवजी ‘खाव खाव’ असा नारा दिला. जिवंतपणी पैसे खाणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी हे उद्या हयात राहीले नाही तर त्यांच्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी पैशेच ठेवावे लागतील म्हणून आम्ही पैशाचा नैवेद्य दाखविला असल्याचे पाचंगे म्हणाले. या थीप पार्क प्रकल्पाच्या जागेवर सुरूवातीला आप्पासाहेब पवार उद्यान होते. या ठिकाणी परिसरातील नागरिक फेरफटका मारण्यासाठी, लहान मुले खेळण्यासाठी येत असत. त्या जागेवर विशेष प्रकल्प म्हणून बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचे काम सुरू केले. परंतू ते अर्धवटच राहिले आहे. ही जागा अनेक महिन्यांपासून पडीक आहे, त्यावर झाडे वाढून जंगल झाले आहे, संध्याकाळच्या वेळेस तेथए गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. स्थानिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हे आंदोलन केल्याचे मनसेने सांगितले. या प्रकल्पाचे कंत्राट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मनसेने केली आहे. या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ राजेंद्र कांबळे या कार्यकर्त्याने मुंडनही केले आहे. यावेळी पुष्कर विचारे, किरण पाटील, सौरभ नाईक, सचिन सरोदे, दीपक जाधव, प्रमोद पाताडे व इतर मनसैनिक उपस्थित होते.