‘मनसे’ने टोलनाक्यांवर लावले ९० सीसीटीव्ही; १२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 07:12 AM2023-10-17T07:12:50+5:302023-10-17T07:13:06+5:30
टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : टोल दरवाढ रद्द करा किंवा ठाणेकरांना टोलमाफीतून मुक्तता द्या, या मागणीसाठी मनसेने काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु आता यापुढेही जाऊन मनसेने ठाणे आनंदनगर, एलबीएस मार्ग, ऐरोली, वाशी या टोलनाक्यांवर तब्बल ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. १८ ऑक्टोबरपासून हे कॅमेरे सुरू होतील. त्यानंतर या ठिकाणी रोज किती वाहने येतात आणि किती जातात, याचा संपूर्ण डेटा ते राज्य सरकारला सादर
करणार आहेत.
टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्य सरकारबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत वाहने पाच टक्केच वाढल्याने टोल दरवाढ कमी करता येणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. मात्र, वाहने वाढली असून, टोलदेखील जास्त आकारला जात असल्याचा आरोप मनसेने केला हाेता.
१२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद
आनंद नगर आणि एलबीएस मार्गावरील टोलनाक्यांवरून सोमवारी दिवसभरात ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये असलेल्या सॉफ्टवेअर झाली. टाेलनाक्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे निश्चितच वाहनांची संख्या वाढली असून याबाबतचे पुरावेच आम्ही राज्य सरकारला सादर करू, अशी माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.