ठाण्यात आंदोलनादरम्यान मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान, शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 10:53 PM2020-06-11T22:53:21+5:302020-06-11T22:56:02+5:30

गोकुळ नगर येथील नाले सफाईकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्याचे सांगत शहर अध्यक्ष मोरे यांनी त्या नाल्यात उतरून गुरुवारी दुपारी आंदोलन केले. यावेळी नाल्यात उतरून केलेल्या या आंदोलनात राजमुद्रा असलेला पक्षाचा झेंडाही वापरण्यात आला होता.

MNS insulted chhatrapati shivaji maharaj's Rajmudra During the agitation in Thane | ठाण्यात आंदोलनादरम्यान मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान, शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप

ठाण्यात आंदोलनादरम्यान मनसेकडून शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान, शिवसेनेसह इतर संघटनांचा आरोप

Next

 ठाणे - गोकुळ नगर येथे नाल्यात उतरून केलेल्या  आंदोलनावेळी मनसेने राजमुद्रा असलेला आपल्या पक्षाचा झेंडा वापरून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमुद्रेचा तसेच स्वतःच्या पक्षाचाही अपमान केल्याचा आरोप शिवसेना, अर्जुन प्रतिष्ठान आणि भारतीय मराठा महासंघाने केला आहे. मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी हे आंदोलन केल्याने त्यांची पक्षाने या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

गोकुळ नगर येथील नाले सफाईकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्याचे सांगत शहर अध्यक्ष मोरे यांनी त्या नाल्यात उतरून गुरुवारी दुपारी आंदोलन केले. यावेळी नाल्यात उतरून केलेल्या या आंदोलनात राजमुद्रा असलेला पक्षाचा झेंडाही वापरण्यात आला होता. तसेच, एक कार्यकर्ता तो झेंडा नाल्यात घेऊन नाल्याच्या मध्यभागी उभाही होता. तो झेंडा आंदोलन करताना नाल्यात उतरवल्याने त्याला विरोध करीत शिवसेनेसह, अर्जुन प्रतिष्ठान, भारतीय मराठा महासंघाने आक्षेप घेतला आहे.

अर्जुन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशांत निकम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिले असून त्यात राजमुद्रेचा शहर अध्यक्ष मोरे यांनी अपमान केल्याचे म्हटले आहे. निकम लोकमतशी बोलताना म्हटले की, नाल्यात हा झेंडा उतरवणे म्हणजे हा राजमुद्रेचा अपमानच आहे. स्टंट करताना कुठे झेंडा वापरावा याचे भान मोरे याना नाही. ते एका जबाबदार पदावर आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राजमुद्रेचा अपमान होईल अशा ठिकाणी पक्षाचा झेंडा वापरू नये असा आदेश दिला होता. परंतु मोरे यांनी त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवून स्वतःच्या पक्षाचा शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करून हकालपट्टी करावी.

शिवसेनेचे उपविभागप्रमुख बाळा गवस म्हणाले की, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शहर अध्यक्षाने राजमुद्रा असलेला पक्षाचा झेंडा नाल्यात उतरवणे हे त्यांच्या पक्षाला शोभत नाही. प्रत्यक्षात पाहिले तर तो गाळ नसलेला नाला आहे, प्रसिद्धी साठी कुठेही झेंड्याचा वापर केला जातोय.  मोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी. भारतीय मराठा महासंघाचे प्रवक्ता स्वप्नील शिंदे म्हणाले की, मोरे यांनी राजमुद्रा असलेला झेंडा नाल्यात उतरवून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि समस्त मराठा समाजाचा अपमान केला आहे. स्वतःच्या स्टंटबाजीसाठी मोरे यांनी राजमुद्रेचा गैरवापर केला आहे. त्यांनी आचारसंहिता पाळायला हवी होती. नाल्याच्या बाहेर दूर अंतरावर उभे राहून तो झेंडा हातात घेतला असता तर चालले असते परंतु नाल्यात झेंडा उतरविणे हे गैर आहे याचा भारतीय मराठा महासंघ निषेध करीत आहे.

याबाबत मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे आपल्या स्पष्टीकरयात म्हणाले की, मी स्वतः झेंडा हातात घेतला नव्हता, तो कार्यकर्त्यांनी आणला होता. तो झेंडा हातात घेतला होता, नाल्यात ठेवला नव्हता. त्यामुळे शिवाजी महाराजांचा, झेंड्याचा आम्ही अपमान केलेला नाही. कोणाच्याही भावना दुखवणे हा आमचा उद्देश नाही. मलाही शिवाजी महाराज यांचा आदर आहे. त्यांचा मी भक्त आहे. राज ठाकरे यांनी मला विचारले तर मी या बाबत खुलासा करिन असे त्यांनी सांगितले. नाल्यात झेंडा उतरविणे योग्य की अयोग्य याबाबत मात्र मोरे यांनी उत्तर दिले नाही. शिवाजी महाराजांनी लोकहितासाठी काम केले होते. मनसेच्या झेंड्याचा वापर करून नाल्याच्या साफसफाईचा प्रश्न सुटत असेल तर चांगली गोष्ट आहे असे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उत्तर दिले. राजमुद्रा असलेला पक्षाचा झेंडा नाल्यात उतरविणाऱ्या शहर अध्यक्षाची पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे, तसेच पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी अर्जुन प्रतिष्ठानने केली आहे.

Web Title: MNS insulted chhatrapati shivaji maharaj's Rajmudra During the agitation in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.