मनसे विद्यार्थी सेनेच्या निवेदनाची पालिकेकडून दखल, एस. जी. इंग्रजी शाळेला बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 04:34 PM2018-12-05T16:34:43+5:302018-12-05T16:37:47+5:30
मनसे विद्यार्थी सेनेच्या निवेदनाची पालिकेकडून दखल घेतली आहे.
ठाणे : दुरावस्थेच्या विळख्यात अडकलेल्या घोडबंदर रोड येथील एस.जी. इंग्रजी शाळेबाबत मनसे विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनाची ठाणे महापालिकेने दखल घेतली आहे. या शाळेला पालिकेने नोटीस बजावली असून येत्या आठ दिवसांत शाळेकडून उत्तर न आल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल असे पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, शाळेची अत्यंत दुरावस्था असल्याचा दुजोराही त्यांनी दिला.
शाळेतील पत्र्याच्या भिंती, दरवाजे नसलेले शौचालय, तोडकी-मोडकी बैठक व्यवस्था अशी एस.जी. इंग्रजी शाळेची अवस्था मनसे विद्यार्थी सेनेने ठाणे महापालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणली. अशा सर्व गोष्टींकडे डोळेझाक करु न प्रशासन येथे शिक्षण घेणाºया विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात आणत आहेत. अशा खाजगी शाळांना मान्यता कशी मिळते असा सवाल मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी संबंधित अधिकाºयांकडे उपस्थित केला. या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांनी पाटील यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींवरुन त्यांनी या शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षण्यायोग्य व्यवस्था करावी अन्यथा या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. तसेच, शाळेलाही आंदोलनाचा इशारा दिला. मनसे विद्यार्थी सेनेचे निवेदन प्राप्त झाल्यावर पालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेला भेट दिली. त्यावेळी ही शाळा बंद होती. त्यामुळे पालिकेच्या शिक्षणाधिकारी ऊर्मिला पारधे यांनी त्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा या शाळेबाबत शासनस्तरावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------
या शाळेला आम्ही नोटीस बजावली असून त्या नोटीस मध्ये कोणाच्या परवानगीने ही शाळा सुरू केली, कोणाची मान्यता घेतली असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले आहे. आठ दिवसांत उत्तर न आल्यास या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला आठ दिवसांनंतर पाठविला जाईल.
- ऊर्मिला पारधे, शिक्षणाधिकारी, ठामपा
*पालिकेने आमच्या निवेदनाची दखल घेतली असली तरी कारवाईच्या नावाथ्खाली काय करतात ते पाहणार अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल. या शाळेची मान्यता रद्द करावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.
- किरण पाटील, मनविसे