साफसफाईच्या खाजगीकरण निषेधार्थ; उल्हासनगर महापालिकेसमोर मनसे कामगार संघटनेचे ठिय्या आंदोलन
By सदानंद नाईक | Published: April 3, 2023 07:03 PM2023-04-03T19:03:32+5:302023-04-03T19:03:48+5:30
साफसफाईच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ उल्हासनगर महापालिकेसमोर मनसे कामगार संघटनेने ठिय्या आंदोलन केले.
उल्हासनगर: महापालिकेने अटी-शर्तीचा उल्लंघन करून प्रभाग समिती क्रं-३ मधील साफसफाईचे खाजगीकरण केल्याचे आरोप मनसे कामगार संघटनेचे नेते दिलीप थोरात यांनी केला. खाजगीकरणाच्या निषेधार्थ थोरात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत शिष्टमंडळाने चर्चा केली.
उल्हासनगर महापालिकेने शहरात स्वच्छता राहण्यासाठी प्रायोगिकतत्वावर प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाई करण्याचा ठेका खाजगी ठेकेदाराला दिला. गेल्या आठवड्या पासून ठेकेदाराने २७० कंत्राटी कामगाराच्या मदतीने समिती अंतर्गत साफसफाई सुरू केली असून महापालिकेवर वर्षाला १० कोटी पेक्षा जास्त भुर्दंड पडणार आहे. साफसफाईच्या खाजगीकरणाला मनसे कामगार संघटनेने सुरवाती पासून विरोध करून ठेका रद्द करण्याची मागणी केली. ठेका देतांना अटीशर्तीचे उल्लंघन करण्यात आला असून एकाच ठेकेदाराला महापालिकेचे विविध ठेके कसे काय दिले जाते?. असा प्रश्न थोरात यांनी व्यक्त केला. सोमवारी दुपारी अड्डीच वाजता महापालिका प्रवेशद्वार समोर दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मनसे कामगार संघटनेचे नेते दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळा सोबत चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच साफसफाईचा ठेका देताना अनियमितता असेलतर, कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती थोरात यांनी दिली. आयुक्तांच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतल्याची माहिती थोरात यांनी दिली. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे व अखिल भारतीय कामगार संघटनेचे नेते राधाकृष्ण साठे यांनीही साफसफाई खाजगीकरणला विरोध करून तसे निवेदन महापालिकेला दिले. तसेच ५ एप्रिल रोजी यानिषेधार्थ महापालिकेत पेन डाऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते साठे यांनी दिली. तर सामाजिक कार्यकर्ते रगडे यांनी साफसफाईचे खाजगीकरण करण्यात आलेल्या प्रभाग समिती मधील जुन्या कामगारांना एकत्रित बदली न करता, टप्प्याटप्प्याने करण्यात यावी. अशी मागणी केली.
साफसफाईचा ठेका सर्वांच्या टार्गेटवर
शहरातील साफसफाई व्यवस्थित सफाई कामगारात करीत असताना, महापालिका, तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षाने स्वच्छतेच्या नावाखाली प्रभाग समिती क्रं-३ मधील साफसफाईचे खाजगीकरण का व कोणासाठी केले? असा प्रश्न शहरातून विचारला जात आहे. दरम्यान साफसफाई खाजगीकरणाला सर्वस्तरातून हळूहळू विरोध होत आहे.