मनसे नेते अविनाश जाधव यांना पुन्हा मुंब्य्रात प्रवेशबंदी
By अजित मांडके | Published: April 8, 2023 03:34 PM2023-04-08T15:34:44+5:302023-04-08T15:35:22+5:30
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू केली होती. परंतु त्यानंतर आता या बंदीत वाढ करण्यात आल्याचे दिसत आहे.
ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू केली होती. परंतु त्यानंतर आता या बंदीत वाढ करण्यात आल्याचे दिसत आहे. जाधव यांना आता १० ते २३ एप्रिल या कालावधीसाठी मुंब्य्रात बंदी घालण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा शहरातील अनधिकृत मशीद, दर्ग्यावर कारवाई केली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदीर उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानुसार पहिली बंदी घालण्यात आली होती. आता येत्या ११ एप्रिल रोजी त्यांचा मुंब्य्रात करण्यात येणार आहे. परंतु त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम येथील अनधिकृत दर्गा विषयीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही मुंब्रा शहरात वन विभागाची जागेत उभ्या असलेल्या दर्गा, मशीद आणि मजार विषयी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच १५ दिवसांत कारवाई झाली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदिर उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार सुरवातीला ९ एप्रिलपर्यंत मुंब्रा शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली होती.
दरम्यान, आता सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे. याच कालावधीत मुंब्य्रात जाधव यांचा ११ एप्रिल रोजी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळेस भाषणाच्या माध्यमातून प्रक्षोभक भाषण करण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नव्याने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे. त्यातून येथील जनता याला विरोध करु शकते. तसेच त्यातून मुंब्य्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते असेही म्हटले आहे. त्यानुसार जाधव यांना आता १० एप्रिल ते २३ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत मुंब्य्रात बंदी घालण्यात आली आहे.
इशरत जहॉं चालते, दहशतवादी चालतात आणि माझ्या शहराचा भाग असलेल्या मुंब्य्रात मला बंदी घातली जाते हे अयोग्य आहे. मी मुंब्य्रातील अनाधिकृत मशिदींबाबत बोलत आहे. आज त्यावर कारवाई झाली नाही तर भविष्यात मुंब्य्राचा डोंगर हा अनाधिकृत बांधकामांनी भरुन गेलेला असेल. मात्र शहराच्या विकासाच्या आणि हिताच्या दृष्टीने जर बोलत असले आणि त्यावरुन बंदी घातली जात असले तर ती मला मान्य आहे.
अविनाश जाधव, ठाणे - पालघर जिल्हाअध्यक्ष