"सत्ता परिवर्तनापासून हिम्मत वाढलीय, पैसे खाल्ले नसते तर..."; मुंब्र्यातील घटनेवरुन मनसे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:44 IST2025-01-03T13:39:27+5:302025-01-03T13:44:12+5:30
मुंब्र्यात मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्यावरुन मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले आहेत.

"सत्ता परिवर्तनापासून हिम्मत वाढलीय, पैसे खाल्ले नसते तर..."; मुंब्र्यातील घटनेवरुन मनसे आक्रमक
Avinash Jadhav: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुंब्य्रात फळविक्रेते आणि मराठी तरुण यांच्यात मराठी बोलण्यावरुन झालेल्या वादाने स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. मराठी बोलण्यावरुन झालेल्या वादानंतर जमावाने मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली आहे. या सगळ्या प्रकारावरुन मनसे आक्रमक झाली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाण करणाऱ्यांना इशारा दिला आहे. यासोबत अविनाश जाधव यांनी आता भोगा कर्माची फळे असंही म्हटलं आहे.
मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याशी मराठीत बोलण्याची मागणी केल्याने हा प्रकार घडला. ही मागणी विक्रेते आणि तरुण यांच्यात वादाचे कारण ठरली. वादावादीदरम्यान हे प्रकरण चांगलेच तापले आणि उपस्थित जमावाने हस्तक्षेप केला. त्यानंतर या मराठी तरुणाला मुंब्रा पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथे त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. यादरम्यान जमावाने तरुणाला धमकावत माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल देखील करण्यात आला. या प्रकरणावरुन नव्या वादाला तोंड फुटले. मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागतीये तेही महाराष्ट्रात! हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार, आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याच साठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते… आता भोगा कर्माची फळ…’ असं अविनाश जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
"मराठी माणसाच्या बाबतीत आता अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्या आहेत. या लोकांची इतकी हिंमत होतेच कशी की हे व्हिडिओ रेकॉर्ड करून मराठी बोलणार नाही असं सांगतात आणि तो व्हिडिओ व्हायरल करतात. जर असेच घडत राहिलं तर मराठी माणसांचं अस्तित्व विकोपाला येईल. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये हिम्मत वाढली आहे. भविष्यात मराठी माणसांवरील हल्ले वाढतील कारण यांच्या हिमती वाढायला लागल्या आहेत. यांना जर आत्ताच ठेचले नाही तर भविष्यात मराठी माणसाला चौका चौकात मारले जाईल. त्यामुळे माझी मराठी माणसांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र या," असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं.
"मतदानाच्या दिवशी मराठी माणसाने पैसे खाल्ले नसते आणि मनसे सोबत उभे राहिले असते तर आज यांची हिम्मत झाली नसती. हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो. मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे. आम्ही त्यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहू," असंही अविनाश जाधव म्हणाले.